घुग्घुस प्रदूषण आंदोलन: आझाद मैदानावर अन्नत्याग करणारे आंदोलक

घुग्घुस प्रदूषण आंदोलन: आझाद मैदानावर बेमुदत अन्नत्याग; पर्यावरण परवानगी रद्द करण्याची मागणी

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 26, 2026

चंद्रपूर/मुंबई – घुग्घुस प्रदूषण आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सुरू झाले. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने बेमुदत अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. संस्थेच्या आरोपानुसार, घुग्घुसमधील एका कारखान्यामुळे वायू आणि जलप्रदूषण होत आहे. कारखान्याची पर्यावरण परवानगी रद्द करण्याची त्यांची मागणी आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांच्या नेतृत्वाखाली उसगावचे शेतकरीही सहभागी झाले आहेत. (नशामुक्त चंद्रपूरसाठी पोलिसांची मोहीम, वाचा बातमी)

घुग्घुस प्रदूषण आंदोलन: आझाद मैदानावर सुरू

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील मे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कारखान्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू व जलप्रदूषण होत असल्याचा गंभीर आरोप करत, कारखान्याची पर्यावरणविषयक परवानगी रद्द करण्याच्या आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी आज, सोमवार, दिनांक २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत अन्नत्याग जनआंदोलनाला सुरुवात झाली आहे. संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वारलुजी बेले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

संस्थेने दिलेल्या निवेदनानुसार, कारखान्यातून निघणारा धूर, रासायनिक घटकयुक्त सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्याच्या अयोग्य विल्हेवाटीमुळे परिसरातील शेती, नदीचे पाणी, नागरिकांचे आरोग्य तसेच पशुपक्ष्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत. विशेषतः उसगाव नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्यामुळे पुढे वर्धा नदीचे पाणी दूषित होत असून शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांच्या अहवालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर वसुमती पंत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे कास्तकार मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बापूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बापूजी राजूरकर आणि नितेश पांडुरंग ठाउरी यांच्यासह उसगावच्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या आंदोलनात शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment