चिमूर – जांभूळघाट आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांच्या सुविधांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या शाळेत ५७२ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यात ३०० मुले आणि २७२ मुली आहेत. महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शाळेची पाहणी केली. पुरेसे बेड उपलब्ध नसल्याचे आणि विद्यार्थिनींना खाली झोपावे लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे ते म्हणाले. त्यांनी तातडीने बेड उपलब्ध करून देण्याची आणि रिक्त पदे भरण्याची मागणी केली. या प्रकरणाबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. (नापिकीचे संकट, शेतकऱ्याची आत्महत्या, वाचा बातमी)
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या राहण्याची व्यवस्था, भोजन, स्वच्छता, आरोग्यसेवा तसेच शाळेतील इतर सुविधांबाबत माहिती घेण्यात आली. विद्यार्थ्यांनीही आपल्या अडचणी ब्राम्हणवाडे यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांच्या आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
जांभूळघाट आश्रमशाळा : बेड आणि मूलभूत सुविधांचा प्रश्न
शाळेतील काही कर्मचारी व्यसनाच्या आहारी गेल्याची माहिती असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच रिक्त पदे त्वरित भरावीत, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आणि एका अधीक्षकावर असलेला अतिरिक्त कामाचा भार कमी करावा, अशी मागणीही त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
या गंभीर परिस्थितीची माहिती प्रशासनाला मिळूनही संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी का केली नाही, असा सवाल उपस्थित करत महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी विभागीय आयुक्त आयुषी सिंग यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. आश्रमशाळेतील परिस्थितीची तातडीने चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली.
“५७२ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा आणि भवितव्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्या सुरक्षिततेशी आणि हिताशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा इशारा महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी दिला.
यावेळी प्रमोद चौधरी, राजू कापसे, अविनाश अगडे, प्रशांत डवले, मिलिंद खोब्रागडे, अमोल मालके, रोहन नन्नावरे, कुंदन पडवेकर, निखिल करमेंगे, स्वप्नील दोहतरे, हरीश मुळे, सूरज चौधरी, अमर नवघडे, हुकूमसिंग जुनी, बागवान डहारे, समीर कुळमेथे, मधुकर मुंगले, ज्योतीताई मुंगले, मंजूताई रामटेके आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






