Lokadhikar Sena Chandrapur Morcha press conference by Gomati Pachbhai

चंद्रपूर व गडचिरोलीतील उद्योगांत स्थानिकांना ८०% आरक्षण द्या; ७ सप्टेंबरला धडकणार लोकाधिकार सेनेचा भव्य रोजगार महामोर्चा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

September 3, 2026

चंद्रपूर : Lokadhikar Sena Chandrapur Morcha चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के रोजगार मिळावा यासाठी मोठा लढा सुरू झाला आहे. या मागणीसाठी सोमवार, ७ सप्टेंबर रोजी भव्य रोजगार हक्क महामोर्चा काढण्यात येणार आहे. स्थानिक उद्योगांमध्ये बाहेरील कामगारांना प्राधान्य देऊन स्थानिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राजवाडा हॉटेलमधील पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गोमती पाचभाई यांनी ही माहिती दिली.

हा महामोर्चा गांधी चौक येथून निघून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उद्योजक व प्रशासकीय अधिकाऱ्यांची विशेष बैठक होणार आहे. (हे हि वाचा – शासकीय बैठकीत अधिकाऱ्यांची दांडी, खासदार धानोरकर संतापल्या)

Lokadhikar Sena Chandrapur Morcha : स्थानिक रोजगारासाठी मोठा एल्गार

विपुल कोळसा, वीज, खनिज संपत्ती आणि मोठ्या उद्योगांनी समृद्ध असलेल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक कंपन्या आणि कारखान्यांच्या व्यवस्थापनाकडून बाहेरील कामगारांना सर्रास प्राधान्य दिले जात असून, आपल्याच मातीतील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे ‘आधी आमच्या मातीतील भूमिपुत्रांना रोजगार द्या, मगच इतरांचा विचार करा’ असा स्पष्ट इशारा देत जिल्ह्यातील सर्व कंपन्या व उद्योगांमध्ये स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपुरात ऐतिहासिक ‘भव्य रोजगार हक्क महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा मांडण्यासाठी स्थानिक राजवाडा हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्थानिय लोकाधिकार सेनेच्या जिल्हाप्रमुख गोमती शारदा मनोहर पाचभाई यांनी ही माहिती दिली.

जिल्ह्यातील उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकरी आरक्षणाची मागणी

पत्रकार परिषदेत माहिती देताना गोमती पाचभाई यांनी सांगितले की, निसर्गाने भरभरून दिलेल्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार स्थानिक भूमिपुत्रांचा आहे; मात्र व्यवस्थापनाच्या दुटप्पी धोरणामुळे आज चंद्रपूर आणि गडचिरोलीतील सुशिक्षित तरुण हाताला काम नसल्याने हवालदिल झाला आहे. हा अन्याय आता सहन केला जाणार नसून ‘आमचा जिल्हा, आमचा रोजगार’ या भूमिकेवर लोकाधिकार सेना ठाम आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता चंद्रपूर महानगरपालिका पटांगण (गांधी चौक) येथून हा भव्य महामोर्चा निघणार असून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

केवळ मोर्च काढण्यापुरते हे आंदोलन मर्यादित नसून, दुसऱ्याच दिवशी मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहामध्ये जिल्ह्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांचे व्यवस्थापन आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची एक विशेष उच्चस्तरीय बैठकही आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष गजाननजी कीर्तिकर, कार्याध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, उद्योगमंत्री उदयजी सामंत, पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनीषा कायंदे, लोकसभा संपर्कप्रमुख आमदार कृपालजी तुमाने आणि युवा सेना संपर्कप्रमुख हर्षल शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने पार पडणार आहे. या बैठकीला शिवसेना नेते गजाननजी कीर्तिकर आणि महासंघाचे सरचिटणीस अरुणजी मोरे यांच्यासह लोकाधिकार सेनेचे प्रमुख पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून उद्योजकांकडून स्थानिकांना ८० टक्के रोजगाराची अंमलबजावणी करून घेण्यावर ठोस निर्णय घेतील.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी, कामगार आणि सुजाण नागरिकांनी आपल्या हक्कासाठी आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी सर्व मतभेद विसरून ७ सप्टेंबरच्या या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहनही यावेळी करण्यात आले. या पत्रकार परिषदेला व आंदोलनाच्या नियोजनात ॲड. संदीप धानोरकर, समिर आवारी, इंजि. प्रशांत कोपुला, ॲड. प्रशांत गिरडकर, मनोज कांबळी, इंजि. अभिजीत खडसे, ॲड. प्रेमा आईचवार, ॲड. मृणालिनी रंगारी, महेश चितारकर, बंडू पहाणपटे, मयूर मनोहर पाचभाई, महेश आक्केवार, डॉ. आशिष मारोतराव आसुटकर, स्वामी, कोमल मोहितकर, सुहास पानघाटे, सचिन धिपे, साईनाथ उपरे, मुकेश गाडगे, विजय रामगीरकर, मयुर चाफले तसेच महिला आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment