Akshaya Tritiya Muhurat : चंद्रपूर - अक्षयतृतीयेचा मुहुर्त हा अत्यंत शुभ मानला जातो. या मुहुर्तावर छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण व शहरी भागात 19 एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षयतृतीयेला बालविवाह होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी केले आहे. (कोट्यवधी रुपयांचा कापूस जळून खाक)
भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलांचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायदेशीर ठरतो. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक, तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यरत आहेत. गावागावांत सरपंच, पोलिस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापुर्वी वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असुन यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळयात सहभागी होणारे वऱ्ह्याडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक आणि बिछायत केंद्र चालक यांच्यावरही दाखल होऊ शकतो. तसेच दोर्षीना 2 वर्ष सश्रम कारावास आणि 5 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री क्रमांकावर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
येथे करा तक्रार : तुमच्या गावात किंवा परिसरात बाल विवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास, त्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलिस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Leave a Comment