आई-मुलाच्या नात्याला लागला 'कारल्याचा' कडवटपणा! मद्यधुंद मुलाने आईचा घेतला बळी

February 20, 2026 by Prakash Hande

 

Bitter gourd dispute murder : मूल (चंद्रपूर) - चंद्रपूर जिल्ह्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कारल्याची भाजी एखाद्याच्या मृत्यूचे कारण ठरू शकते, हे ऐकूनही धक्का बसतो. मात्र कारल्याच्या भाजीवरून आई–मुलाच्या नात्यात अशी कटुता निर्माण झाली की, मुलाने क्षुल्लक कारणावरून स्वतःच्या आईची निर्घृण हत्या केली. (आरटीओ च्या नावाने मॅसेज तर आला तर सावधान)

 

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील डोंगरगाव येथे घडली. मृत महिलेचे नाव ६५ वर्षीय सुमित्रा पेटकुले असे असून आरोपी मुलगा ३७ वर्षीय जगदीश पेटकुले याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

आरोपीला दारूचे व्यसन होते. दोन महिन्यांपूर्वी त्याची पत्नी घर सोडून गेली होती. त्यानंतर तो आपल्या आईसोबत राहत होता. १९ फेब्रुवारीला जगदीश हा रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आला, जेवणाला काय बनविले असे तो आईला म्हणाला आईने यावर कारल्याची भाजी केली असे म्हटल्यावर जगदीश चा पारा चढला कारण त्याला कारल्याची भाजी आवडत नव्हती यावरून जगदीशने आईशी वाद घातला. 

 

वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी मुलाने आपल्या आईला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली तसेच तिचे डोके आपटले. ही मारहाण अत्यंत क्रूर स्वरूपाची होती. त्यात सुमित्रा पेटकुले यांचा जागीच मृत्यू झाला.

 

हत्यानंतर आरोपीने गावातील चौकात जाऊन आईची हत्या केल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने गावकऱ्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळानंतर संशय आल्याने गावकऱ्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले.

 

माहिती मिळताच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी जगदीश पेटकुले याला अटक केली. Son Kills Mother

या प्रकरणाबाबत मूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी सांगितले की, कारल्याच्या भाजीवरून झालेल्या वादातूनच ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

+