पराभवामुळे महापौर पदाची संधी हुकली

January 23, 2026 by Prakash Hande

Candidate Defeat Analysis : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, याला एकमेव कारण म्हणजे नेते, ज्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडले, आधी तिकीट वाटपात गोंधळ, यादी मध्ये घोळ असे अनेक प्रकार प्रथमच चंद्रपूरकरांनी बघितले. या सर्व घोळात प्रामाणिक उमेदवार यांचा पराभव झाला, भाजप महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे ज्या सर्व्हेत पहिल्या क्रमांकावर होत्या, इतर पक्ष त्यांच्या विरोधात आधी उमेदवार द्यायलाही तयार नव्हते, पण त्यांचा हि या निवडणुकीत पराभव झाला, आज वैरागडे या निवडणूक जिंकल्या असत्या तर त्या महापौर पदाच्या उमेदवार असत्या, मात्र पराभवाने त्यांची संधी हुकली. सध्या जटपुरा प्रभागात त्यांच्या पराभवावर अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरु आहे. (महापौर पदासाठी बहुमताचा खेळ)

 महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली, पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली मात्र तिकीट वाटपात चांगलाच गोंधळ उडाला, विशेष बाब म्हणजे जटपुरा प्रभाग क्रमांक ७ मध्ये महायुती उमेदवार हे सर्व छबू वैरागडे यांच्यावर अवलंबून होते, त्याचं कारण म्हणजे छबू वैरागडे यांची प्रभागात चांगली ओळख, नागरिकांच्या समस्या सोडविण्यास त्या नेहमी अग्रेसर असायच्या, प्रभागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे त्यांचं रोजचं काम होत. मनपा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली. मात्र उमेदवार कोण हे अद्यापही घोषित झाले नव्हते. जे प्रभागात फिरत नाही त्यांना उमेदवारी देण्यात आली.

छबू वैरागडे यांच्या खांद्यावर जटपुरा प्रभागातील निवडणुकीची धुरा टाकण्यात आली, वैरागडे यांनी निवडणुकीत जीव ओतला मात्र स्थानिक आमदार जोरगेवार यांनी फारशी मेहनत घेतली नाही, त्यांनी उमेदवारांना वाऱ्यावर सोडले अशी चर्चा नागरिकांनी सुरु केली आहे, आमदार मुनगंटीवार यांनी जटपुरा प्रभागात सभा गाजवल्या. मतदानाच्या एक दिवस आधी प्रभागात अनेक बोगस मतदार आणल्या गेले अशी चर्चा चांगलीच रंगली आहे, गुंड प्रवृत्तीचे बाहेरील व्यक्ती जटपुरा प्रभागात पैसे वाटपाचे काम करीत होते. साधी निवडणूक हि प्रतिष्ठेची बनविण्यात आली. मतदान भरघोस व्हावे याकरिता बाहेरून बोगस मतदार रात्री प्रभागात दाखल झाले होते. प्रभागातील मते वगळता इतर भागातील नागरिकांना बोलावून मतदान करण्यास लावले. त्यामुळे वैरागडे हरल्या. Candidate Defeat Analysis

प्रभागातील नागरिक म्हणतात कि आज जर त्या निवडून आल्या असत्या तर महापौर पदासाठी त्या योग्य उमेदवार होत्या, पण पराभवाने त्यांची सोनेरी संधी हुकली. विशेष म्हणजे प्रभागात झालेले एकूण मतदान व निकालात जाहीर करण्यात आलेले मतदान यामध्ये चांगलीच तफावत आहे. आपला समर्थक निवडून यावा यासाठी नेत्यांनी जोर लावला जर स्थानिक आमदार जोरगेवार यांनी सर्वच उमेदवारांसाठी ताकद लावली असती तर आज भाजप मनपामध्ये बहुमतामध्ये असतं. आज वैरागडे हरल्या असतील तरीही त्या दुसऱ्या दिवसापासून प्रभागातील अडचणी सोडविण्यासाठी पुन्हा रुजू झाल्या. प्रभागातील नागरिक म्हणतात कि नेत्यांच्या व चुकीच्या उमेदवारामुळे त्यांचा पराभव झाला.

Leave a Comment

+