Cattle Smuggling Case : चंद्रपूर : दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन धाबा हद्दीत, चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखा व राजूरा-गडचांदूर पथकाने संयुक्त कारवाई करत अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून एकूण 26 गोवंशीय जनावरे जप्त करण्यात आली. (ठेकेदाराने मजुराला केली मारहाण, मजुराचा मृत्यू)
कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन पिकअप वाहने, 26 गोवंशीय जनावरे आणि एक मोबाईल फोन असा अंदाजे ₹19,30,000 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात बोलेरो पिकअप चालक विश्वास प्रकाश मांडवगडे (वय 22, रा. इंदिरा नगर वॉर्ड, गोंडपिपरी) याला अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील इतर आरोपींमध्ये क्रिष्णा ऊर्फ चिरकुट (रा. बेबाळ, ता. मुल), रवि तोराम (रा. लक्कडकोट, ता. राजुरा), श्याम मडावी (रा. लक्कडकोट, ता. राजुरा), समीर खान (रा. राजुरा) आणि अज्जु शेख (रा. कागजनगर, तेलंगाणा) यांचा समावेश असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदर आरोपींविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंध अधिनियम 1960 च्या कलम 11(1)(d) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 (सुधारित 2015) मधील कलम 5, 5(A), 5(B), 9 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 119 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई राजूरा-गडचांदूर उपविभागातील स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Comment