चंद्रपूर: एप्रिलमध्ये 30 पैकी 26 दिवस हवा मध्यम प्रदूषित, एकही दिवस चांगला नाही

May 01, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर: उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या चंद्रपूर शहरात आता प्रदूषणाची समस्याही गंभीर होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यातील हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतला असता, ३० दिवसांपैकी तब्बल २६ दिवस हवा 'मध्यम' प्रदूषित श्रेणीत होती, तर केवळ ४ दिवस समाधानकारक नोंदवले गेले. विशेष म्हणजे, खुटाळा परिसरात प्रदूषणाची पातळी अधिक खालावलेली असून तिथे दोन दिवस अत्यंत प्रदूषित स्थिती आढळली. एप्रिलसारख्या उन्हाळ्याच्या महिन्यातही प्रदूषणात झालेली ही वाढ चिंताजनक मानली जात असून, वाढती उष्णता, वाहतूक, कचरा ज्वलन आणि बायोमास बर्निंगमुळे धुळीकणांच्या प्रमाणात ही वाढ झाली असल्याची माहिती पर्यावरण व हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपने यांनी दिली आहे. (चंद्रपूर महापौरांना पदमुक्त करा - पप्पू देशमुख)

 

हवेची गुणवत्ता मोजताना प्रामुख्याने धूलिकण (PM 2.5 आणि PM 10), ओझोन Ozone, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, अमोनिया आणि लीड या आठ प्रदूषकांचा विचार केला जातो. एप्रिल महिन्यात शहरात धूलिकण १० (PM 10) चे प्रमाण सर्वाधिक २६ दिवस आढळले, तर धूलिकण २.५ आणि ओझोनचे प्रमाण प्रत्येकी दोन दिवस दिसून आले. यावरून शहरात कचरा जाळणे आणि वाहनांच्या धुरामुळे प्रदूषण वाढल्याचे स्पष्ट होते. आरोग्यदायी मानला जाणारा '० ते ५० AQI' (चांगली श्रेणी) असलेला एकही दिवस या महिन्यात अनुभवायला मिळाला नाही, ही बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा आहे.

Chandrapur Air Pollution: खुटाळा परिसर सर्वाधिक खराब

शहरातील या वाढत्या प्रदूषणामागे थर्मल पॉवर प्लांट, स्थानिक उद्योग, घरगुती कोळसा ज्वलन आणि वाहनांची वाढती संख्या ही मुख्य कारणे आहेत. रस्ते आणि बांधकामाच्या ठिकाणांहून उडणारी धूळ तसेच कचरा जाळल्यामुळे निर्माण होणारा धूर यामुळे हवेचा दर्जा खालावत आहे. प्रदूषणाच्या या वाढत्या पातळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. विशेषतः श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांसाठी ही हवा हानिकारक ठरत असून दमा, ब्रॉन्कायटिस, टीबी, हृदयविकार आणि मानसिक ताणतणावाच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या उष्ण वाऱ्यांमुळे प्रदूषके काही प्रमाणात वाहून जात असली तरी भविष्यातील धोका कायम आहे.

 

प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आता ठोस उपाययोजनांची गरज निर्माण झाली आहे. वृक्षारोपणात मोठी वाढ करणे, शहरात सायकलचा वापर वाढवणे, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे आणि जास्तीत जास्त बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापर करणे आवश्यक झाले आहे. कचरा जाळण्यावर कडक निर्बंध लादण्यासोबतच उद्योगांनीही प्रदूषण रोखण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा राबविणे गरजेचे आहे. स्मॉग टॉवर किंवा फॉग मशीन यांसारखे उपाय केवळ तात्पुरते असून, प्रशासनाने जर कडक धोरणे राबविली आणि नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली, तरच प्रदूषणाच्या या संकटावर मात करणे शक्य होईल, असे मत प्रा. सुरेश चोपने यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment

+