चंद्रपूर: जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने आपली धडक मोहीम तीव्र केली असून आज, १ मे २०२६ रोजी गोंडपिपरी तालुक्यातील पनोरा येथे एका अवैध दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७० हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. (घरगुती वादातून मुलाने केली वडिलांची हत्या)
मिळालेल्या माहितीनुसार, पनोरा येथील रहिवासी तुकाराम वसंत ढुमणे (वय ३५ वर्ष) हा आपल्या 'साई ऑटोमोबाईल' दुकानाच्या पाठीमागील भागात लपून-छपून अवैधरित्या देशी दारूची साठवणूक आणि विक्री करत असल्याची खात्रीशिर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने धाड टाकली असता, आरोपी तुकाराम ढुमणे हा घटनास्थळी देशी दारूची विक्री करताना रंगेहात मिळून आला.
या छाप्यात पोलिसांनी 'रॉकेट संत्रा' नावाच्या देशी दारूच्या ९० मिली भरलेल्या एकूण १७५० बाटल्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मद्यसाठ्याची एकूण किंमत ७०,००० रुपये इतकी आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे अपराध क्रमांक २०९/२०२५, कलम ६५ (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर यशस्वी कारवाई मूल उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, अवैध धंद्यांविरुद्ध अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Leave a Comment