चंद्रपूर जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी बंधनकारक, नियम मोडल्यास कारवाई

May 26, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - पशुधन ही आपली खरी संपत्ती असून त्यांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्राणी क्रुरता प्रतिबंधक कायदा १९६० अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींची ग्रामपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पार पडलेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, सहाय्यक आयुक्त डॉ. हरिहर वरठी, सहायक वनसंरक्षक विकास तरसे, गणेश येळणे आणि पोलिस उपनिरीक्षक सुनील गौरकार प्रामुख्याने उपस्थित होते. (शेतकऱ्यांना डिझल प्राधान्याने द्या - आमदार जोरगेवार)

 

आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे कराव्यात, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या की, २१ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामार्फत गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल व अनधिकृत कत्तलखाने रोखण्यासाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ व प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० यांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल. या अंतर्गत अनधिकृत कत्तलखान्यांवर कडक कारवाई करणे, अवैध जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करणे, संयुक्त भरारी पथके स्थापन करणे आणि सीमावर्ती भागात संयुक्त तपासणी चौक्या उभारणे यासारखी पावले उचलली जातील. तसेच डायल ११२ हेल्पलाईनवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर पोलीस प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही केली जाईल.

 

याशिवाय, संघटित पद्धतीने होणाऱ्या गोतस्करीच्या प्रकरणांमध्ये थेट 'मकोका' (MCOCA) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले असून, बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखून प्राणी क्रूरता प्रतिबंधक तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील. याचसोबत जिल्हाभरात आयोजित करण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यती दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीच्या सुरुवातीला उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी नव्याने गठित प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची उद्दिष्टे, तिचे कार्य तसेच भविष्यातील कार्यपद्धतीबाबत सविस्तर माहिती सादर केली.

Leave a Comment

+