चंद्रपूर - सध्या इंधन पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा आल्याने ग्रामीण भागातील शेतकर्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतातील नांगरणी, वखरणी तसेच मशागतीची कामे वेगाने सुरू असताना ट्रॅक्टर आणि कृषी यंत्रांसाठी डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतीकामांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी शेतकऱ्यांना प्राधान्याने पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सुचना केल्या आहे. (चंद्रपुरात पाणी टंचाई, मनपा काय करतेय?)
याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर भारतीय जतना पार्टीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट सदर मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री नामदेव डाहुले, रविंद्र गुरुनुले, बलराम डोडाणी, मनपा गटनेता शेखर शेट्टी, स्वप्निल डुकरे, अजय चार्लेकर, दुर्गा बावणे, प्रविण गिलबिले, राकेश नाकाडे आदिंची उपस्थिती होती.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, प्रशासनाकडून इंधन वितरण नियंत्रण योग्य असले तरी ग्रामीण भागातील शेतकर्यांसाठी इंधन उपलब्धता अत्यंत गरजेची आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टर व इतर कृषी यंत्रांच्या सहाय्याने केली जातात. मात्र, पुरेशा प्रमाणात डिझेल उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची मशागतीची कामे रखडत आहेत.
यामुळे शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टर आणि कृषी पंपांसाठी शेतकर्यांना प्राधान्याने पेट्रोल व डिझेल देण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच अनेक शेतकर्यांना ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर जाणे शक्य नसल्याने, ७ /१२ उतारा किंवा शेतीसंबंधित पुरावे सादर करणार्या शेतकर्यांना सुरक्षित डब्यांमध्ये गरजे नुसार इंधन देण्यास विशेष सवलत द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या विषयात तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पेट्रोल पंप चालकांना स्पष्ट सूचना द्याव्यात असे मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.
Leave a Comment