child attacked by tiger : चंद्रपूर | 18 सप्टेंबर 2025 - सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी या छोट्याशा गावात आज गुरुवारी रात्री साडेसातव्या सुमारास हृदयद्रावक घटना घडली. गावातीलच दुसरीत शिकणाऱ्या प्रशिल बबन मानकर (वय ७) या चिमुकल्याला अंगणातून पट्टेदार वाघाने उचलून नेले. या घटनेमुळे गावात शोककळा व भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेतात काम करताना महिलेवर वाघाचा हल्ला, महिला ठार
सिंदेवाही तालुक्यातील नवरगावपासून नऊ किलोमीटर अंतरावरील गडबोरी हे गाव जंगल व टेकडीला लागून वसलेले आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचा धोका अनेक वर्षांपासून कायम आहे. नागरिक वन्यप्राण्यांच्या दशहतीत रात्रीचे जिवन जगत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. आज गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास प्रशिल घराच्या अंगणात निघाला असताना त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधत त्याला उचलून नेले, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसऱ्या माहितीनुसार, प्रशिल चे वडील बबन मानकर गावात जेवण करून आपल्या दोन्ही मुलांना हातात घेऊन घरी परतत असताना रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक झडप घालून शुभमला उचलून नेले. या दोन भिन्न माहितीमुळे घटनेचा नेमका प्रकार स्पष्ट झालेला नाही.
गडबोरी गावाच्या इतिहासात अशा स्वरूपाच्या घटना नवीन नाहीत. पाच-सहा वर्षांपूर्वीही अशाच दोन ते तीन घटना येथे घडल्या होत्या. पुन्हा एकदा अशा प्रकारची घटना घडल्याने गावात भीती व संतापाचे वातावरण आहे. नागरिक आपल्या मुलांना घराबाहेर काढण्यास घाबरत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने गडबोरीत दाखल झाले आहे. जंगल व टेकडी परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र वृत्तलेखनापर्यंत प्रशिलचा शोध लागलेला नव्हता.
मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी माहिती दिली की, प्रशिल नामक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी परिसरातील भागात शोध मोहीम सुरू केली आहे. कोणत्या हिंस्र प्राण्याने मुलाला उचलून नेले आहे की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, मुलाचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांनी सांगितले. tiger encounters Chandrapur
प्रशिल हा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीत शिकत होता. मानकर यांना दोन मुले आहेत, त्यापैकी एक मुलगा अशा प्रकारे वाघाच्या तावडीत गेल्याने मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी तातडीने वन्यप्राणी नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. १८ सप्टेंबर रोजी वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या २ घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहे.
Leave a Comment