"ग्रामीण खेळाडूंना संधी मिळाली तर..." दिनेश चोखारे यांनी व्यक्त केला मोठा विश्वास

February 03, 2026 by Prakash Hande

Kabaddi Tournament News Today : बल्लारपूर -  “कबड्डीसारखे पारंपरिक खेळ हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक असून ते आपल्याला मातीशी जोडून ठेवतात. या खेळांमधून युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, चिकाटी आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे अशा खेळांचे जतन व संवर्धन करणे ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे,” असे ठाम प्रतिपादन काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश दादापाटील चोखारे यांनी केले. (पोंभूर्णा गावातील विहिरी कोरड्या, पाण्यासाठी वणवण)

ते बल्लारपूर तालुक्यात कळमना येथे नवयुवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी, मैदाने, प्रशिक्षक व आर्थिक पाठबळ मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर निश्चितच यश मिळवू शकतात, असा विश्वास व्यक्त केला. पारंपरिक खेळांना चालना देण्यासाठी सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजेत्या व उपविजेत्या संघांचा मान्यवरांच्या हस्ते चषक, पदके व रोख बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. खेळाडूंनी दाखवलेल्या चुरशीच्या खेळामुळे उपस्थित क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. संपूर्ण परिसरात क्रीडोत्सवाचे वातावरण अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमाला बल्लारपूर काँग्रेस कमिटीचे ग्रामीण तालुकाध्यक्ष गोविंद उपरे, सामाजिक कार्यकर्ते भास्कर कावळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सोनाली भास्कर कावळे (बांगडे), बल्लारपूर काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष सौ. नाजुका हनुमान आलाम, सामाजिक कार्यकर्ते गणपत नेवारे, राजेश मोरे, कळमना ग्रामपंचायतच्या सदस्या छाया तलांडे, सदस्य संघर्ष रेनकुंटलवार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक, माजी खेळाडू, प्रशिक्षक, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

या यशस्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी नवयुवक क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले असून त्यांच्या मेहनतीमुळेच ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याचे मान्यवरांनी आवर्जून नमूद केले.

Leave a Comment

+