Chandrapur Development Projects : चंद्रपूर : चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आणि परिणामकारक पावले उचलत स्पष्ट रोडमॅप तयार करण्यात आला असून विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. शहरासाठी प्रस्तावित रिंग रोड, नवीन चंद्रपूरमध्ये म्हाडाच्या घरकुलांची उभारणी तसेच झरपट नदीच्या स्वच्छता व पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना राबविण्यात येत असून, “चंद्रपूरच्या सर्वांगीण विकासासाठी माझा ठाम संकल्प आहे,” असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. (चंद्रपुरात आमदार जोरगेवार यांच्या उपस्थितीत गुडी पाडव्याचा सोहळा)
चंद्रपूर शहरातील गांधी चौक येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगीताताई खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, जेष्ठ नेते प्रमोद कडू, महामंत्री डाॅ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, रामपाल सिंग, विजय राऊत, विशाल निंबाळकर, नगरसेविका जयश्री जुमडे, सविता सरकार, सुनीता जयस्वाल, नगरसेवक प्रज्वलंत कडू, रवी लोणकर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, हा सण केवळ परंपरेचा भाग नसून नव्या संकल्पांचा दिवस आहे. साखरेच्या गाठीचा गोडवा आणि कडुलिंबाच्या पानांचा कडवटपणा जीवनातील वास्तव दर्शवतात. सुख-दुःख स्वीकारत नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा या सणातून मिळते. प्रभू श्रीरामांनी वनवास पूर्ण करून अयोध्येत परतल्यानंतर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्यात आली, ही परंपरा आजही प्रेरणादायी आहे.
भारतीय संस्कृतीची एकात्मता अधोरेखित करत आ.मुनगंटीवार सांगितले की, महाराष्ट्रात गुढीपाडवा, कर्नाटकात युगादी आणि तेलंगणात उगादी म्हणून साजरा होणारा हा दिवस आपल्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. अनेक आक्रमणांनंतरही भारतीय संस्कृती टिकून राहिली, कारण तिचा पाया कुटुंबव्यवस्था आणि संस्कारांवर आधारित आहे.यावेळी ‘वंदे मातरम’चा संकल्प करत त्यांनी उपस्थितांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. “वंदे मातरम हा केवळ शब्द नसून स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाची जिवंत आठवण आहे,” असे सांगत त्यांनी दैनंदिन जीवनातही राष्ट्रप्रेम जपण्याचे आवाहन केले.
सामाजिक समरसतेचा संदेश देताना त्यांनी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांप्रती सद्भावना व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने गरजू मुस्लिम बांधवांना खीर व कुर्मा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्याच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत आ.मुनगंटीवार म्हणाले, अयोध्येतील श्रीराम मंदिर, नवे संसद भवन, भारत मंडपम तसेच पंतप्रधान कार्यालयातील फर्निचरमध्ये चंद्रपूरच्या लाकडाचा वापर झाला आहे. या परंपरेला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी बल्लारपूर येथे टिम्बर म्युझियम-झायलरियम उभारले जाणार आहे. Chandrapur Ring Road
आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर शहरातील रिंगरोड प्रकल्पाला पूर्ण क्षमतेने गती देण्याचे काम सुरू आहे. तसेच नवीन चंद्रपूर येथे ५० हेक्टर जागेवर म्हाडामार्फत १० हजार घरांचा प्रकल्प मंजूर असून, पहिल्या टप्प्यात २,००४ घरांसाठी २३४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. झरपट नदीच्या विकासासाठी विधानसभेत लवकरच मुद्दा उपस्थित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
माता महाकालीची पावन भूमी, चिमूरच्या महान क्रांतीकारकांचा इतिहास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अध्यात्म आणि राजमाता राणी हिराई आणि गोंड राजांचा पराक्रम यामुळे चंद्रपूरची ओळख अधिक समृद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत-चीन युद्धाच्या काळात जिल्ह्याने दिलेल्या उल्लेखनीय सोन्याच्या योगदानाची आठवण करून देत त्यांनी चंद्रपूरकरांच्या देशभक्तीचा गौरव केला. गुढीपाडव्याच्या निमित्ताने चंद्रपूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प करीत त्यांनी सर्व नागरिकांना गुढीपाडवा, हिंदू नववर्ष आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच २०२७ चा गुढीपाडवा अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार करण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
१ जुलै रोजी वृक्षारोपणाचे आवाहन
पर्यावरण संवर्धनावर विशेष भर देताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. प्रत्येक प्रभागात झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. “जो आई-वडिलांची सेवा करतो आणि जो मातीची सेवा करतो, त्याला ईश्वर भरभरून देतो,” असे सांगत त्यांनी निसर्गसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.
Leave a Comment