News34
चंद्रपूर – चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात परिचारिकेच्या मृत्यूनंतर परिचारिका संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सीमा मेश्राम नावाची ही परिचारिका प्रसूती कक्षात सेवा देत होती. मात्र कामाच्या अतिताणामुळे या परिचारिकेला 16 ऑगस्ट रोजी भोवळ आली. तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र आपल्याच सहकारी परिचारिकेवर योग्य उपचार करण्यात इथले स्थानिक डॉक्टर अपयशी ठरले.
परिणामी उपचारातील हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाला. ही वार्ता परिचारिका वर्गात पसरताच त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. दरम्यान राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने देखील या आंदोलनात त्यांना सहभाग देत पाठिंबा दिला. सीमा मेश्राम या परिचारिकेच्या मृत्यूसंबंधी जबाबदार डॉक्टर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिचारिका संघटनेने केली आहे.
16 ऑगस्टला परिचारिका कामाच्या तणावात असताना तिला भोवळ आली, रात्री पासून ते सकाळ पर्यंत तिच्यावर कसलाही उपचार करण्यात आला नाही, त्यामुळे मेश्राम यांचा मृत्यू झाला.
याबाबत सविस्तर माहिती घेतली असता अधिष्ठाता यांनी दोषी डॉक्टर वर कारवाई करणेकरिता चौकशी समिती नेमली आहे, चौकशी पूर्ण झाल्यावर कारवाई करण्यात येईल, सध्या परिचारिका यांनी काम बंद आंदोलन पुकारले असून त्यांच्या जागी शिकाऊ परिचारिका यांना पाचारण करण्यात आले आहे.
चंद्रपुरात वाजागाजा करीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली होती, मात्र उपचाराच्या नावावर रुग्णांची हेळसांड ही रोजची बाब झाली आहे, अनेक रुग्ण विविध आजाराने ग्रस्त होऊन चांगला उपचार मिळावा यासाठी वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल होतात मात्र शासकीय काम ज्या पध्दतीने केल्या जाते त्याच पद्धतीने याठिकाणी उपचार होतो, चंद्रपुर जिल्ह्यात अनेक नेते, मंत्री होऊन गेले मात्र आरोग्याच्या दृष्टीने सर्वांच काम हे शून्य आहे.