आमदार सुधाकर अडबाले यांच्या अमृत योजनेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

News34

 

चंद्रपूर : चंद्रपूर शहरासाठी अमृत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. मात्र, या योजनेचा शहरातील अनेक प्रभागात पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी अमृत पाणीपुरवठा योजनेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, अमृत योजनेचे भौतिकदृष्ट्या ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, शहरातील ९५ टक्के भागात पाणीपुरवठा होत असल्याची माहिती दिली आहे.

 

चंद्रपूर शहराला अनेकवर्षे जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात होता. मागील काही वर्षांत शहराचा मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे जुन्या योजनेतून अर्ध्या शहराला पाणीपुरवठा होत नव्हता. नागरिकांना बोअरवेल, विहिरीवर अवलंबून रहावे लागत होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या अमृत योजनेत चंद्रपूर शहर समाविष्ट करण्यात आले.

 

केंद्र सरकार, राज्य शासन आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून या कोट्यवधी रुपयांच्या योजनेला सुरवात झाली. अनेक वर्षांची पाणी समस्या कायमची निकाली निघेल, असे चंद्रपूरकरांना वाटत होते. परंतु, निर्धारित कालावधी लोटूनही योजना पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

शहरातील काही प्रभागात या योजनेचा प्रारंभ करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, आजही अनेक प्रभागात या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आमदार सुधाकर अडबाले यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न उपस्थित केला.

 

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रपूर शहरातील १५ झोनमधील भागात पाईप लाईनने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरास एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. विविध विभागाकडून परवानगी, कोविडमुळे योजनेच्या कामाच्या गतीवर परिणाम झाला आहे.

 

अमृत योजनेचे भौतिकदृष्ट्या ९५ टक्के काम पूर्ण झाले आहेत. प्रकल्प पूर्ण करण्याचे काम वेगाने सुरू असून, योजना सुरू करण्यासाठी झोननिहाय चाचणी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीत या योजनेतून शहरातील ९५ टक्के भागात पाणीपुरवठा सुरू असून, उर्वरित कामे लवकरच पूर्ण करण्याचे नियोजन महानगरपालिका करीत असल्याचे सांगितले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!