सिध्दबली ईस्पातच्या पूर्व कामगारांना रोजगार व थकीत वेतन तातडीने निर्गमित करा – हंसराज अहीर

News34

चंद्रपूऱ- सिध्दबली ईस्पात लिमी. कंपनी, आरसीसीपीएल (परसोडा लाईमस्टोन) विसापूर प्रस्तावीत कोळसा खाण आदी विषयाशी निगडीत विविध प्रश्नांबाबत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे दि. 25 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, पोलिस निरीक्षक पडोली शिवाजी कदम, तहसीलदार विजय पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे बिपीन भंडारे, यु.बी. भडूले, एमआयडीसी चे श्रीकांत जोरावर, गोपाल भिराख, राजु घरोटे, विनोद खेवले, विजय आगरे, अॅड. प्रशांत घरोटे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत सिध्दबली ईस्पात कंपनीमध्ये अन्य मागासवर्गीय तसेच व इतर प्रवर्गातील कार्यरत पूर्व कामगारांना पूर्ववत रोजगार देवून त्यांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याची निर्देश हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. सिध्दबली कंपनी बंद झाल्यापासुन पुर्ववत सुरू झाल्यापर्यंतच्या कालावधीतील अर्ध्या वर्षातील (अडीच वर्ष) वेतन कामगारांना देण्यात यावे अशी सुचना केली.

या कंपनीमध्ये 4 कामगारांचा अपघातात मृत्यू झाला होता. त्या पिडीत कुटूंबियांना कंपनी अधिनियमानुसार नुकसान भरपाईपोटी आर्थिक साह्य त्वरीत अदा करण्यात यावेत असेही निर्देश दिले.
आरसीसीपीएल कंपनीद्वारा परसोडा लीज क्षेत्रातील जमिनीचे LARR ॲक्ट 2015 नुसार अधिग्रहण करण्याकरीता नोटीफीकेशन काढण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनास दिले.

राज्यशासनाचे नोकरीविषयक धोरण 80:20 असतांना या कंपनीमध्ये स्थानिकांना शासनाच्या अनुपातात रोजगार उपलब्ध केला गेलेला नाही. उलट परप्रांतीयांना झुकते माप देवून कंपनीमध्ये प्राधान्य दिले गेले असल्याच्या तक्रारी असुन ही बाब स्पष्ट झाली आहे.
शासनाच्या 80:20 या धोरणाचे अनुपालन होत आहे किंवा नाही याची स्थापित समितीच्या माध्यमातून सखोल चौकशी करण्याची सुचना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

तसेच या कंपनीमध्ये अनेक कामगारांचा दुर्घटनेमुळे बळी गेला असल्याने व काही कामगाराचा संशयास्पद मृत्यू झाला असल्याने या सर्व प्रकरणाची गांभिर्याने चैकशी करून या चैकशीचा सविस्तर अहवाल आयोगाकडे निर्धारित अवधीमध्ये सादर करण्याचे निर्देशही हंसराज अहीर यांनी प्रशासनाला दिले. या बैठकीस उत्तम आमडे, मुन्ना कुशवाह, रमेश सोनटक्के, सत्यपाल खेवले, प्रदिप वासाडे, आदींची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!