News34
चंद्रपूर – केपीसीएल च्या बरांज कोलमाईन्स मध्ये कार्यरत कामगारांचे 6 महिन्याचे प्रलंबित वेतन मिळवून दिल्याबद्दल या कामगारांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दि. 31 ऑगस्ट रोजी भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात सन्मान करीत त्यांचे आभार मानले.
हंसराज अहीर यांनी KPCL (coal Mine) च्या बराज मोकासा येथे कार्यरत असलेल्या या मागासवर्गीय कामगारांना तात्काळ प्रलंबित वेतन देण्याचे निर्देश नागपूर आयुक्त कार्यालय येथे दि. 24 जुलै, 2023 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या सुनावणी दरम्यान केपीसीएल चे प्रबंध संचालकांना दिले होते. याची दखल घेत केपीसीएल प्रबंधनाने अविलंब कार्यवाही करीत या 21 कामगारांचे थकीत वेतन अदा केल्याने या सर्व कामगारांनी कृतज्ञता व्यक्त करीत हंसराज अहीर यांचा सन्मान करुन त्यांच्या सहकार्याप्रती आभार व्यक्त केला.
भद्रावती येथील आशीर्वाद मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजप नेते रमेश राजुरकर, अशोक हजारे, विजय वानखेडे, प्रशांत डाखरे, संजय वासेकर, नरेंद्र जीवतोडे, रामा मत्ते, श्यामबाबु महाजन, अविनाश सिंध्दमशेट्टीवार, प्रदीप मांडवकर, आदिंची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना हंसराज अहीर यांनी उपस्थितांना आश्वस्त करीत मागासवर्गीय कामगार, प्रकल्पग्रस्त व अन्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत राहु, ही शेवटची लढाई नसुन या पुढेही अनेक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली कटीबध्दता व्यक्त केली. या प्रकल्पग्रस्त कामगारांमध्ये बराज, तांडा, मानोरा, पिरबोडी, कोंडा, केसुर्ली व अन्य गावातील कामगार व प्रकल्पग्रस्त बहुसंख्येने उपस्थित होते.
बरांज मोकासा येथे भेट देवून अहीरांनी ऐकल्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा
सदरील कार्यक्रमानंतर हंसराज अहीर यांनी बरांज मोकासा या गावास भेट देवून येथील नागरिक व प्रकल्पग्रस्तांशी विविध विषयांवर चर्चा केली यावेळी प्रकल्पग्रस्तांनी त्यांना आपल्या अडचणी सांगितल्या. ज्यात नोकरी ऐवजी अनुदान, अवार्ड नुसार मोबदला, वाढीव प्रकल्पग्रस्त कुटूंबांना मोबदला तसेच बरांज व अन्य प्रभावित गावांच्या पुनर्वसनाबाबत नागरिकांनी त्यांचेशी विस्तृत चर्चा केली. या सर्वांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले.