स्वातंत्र्य दिनाला महिलांनी पकडली दारू पण…

News34

चंद्रपूर : शासकीय सेवेत असलेला कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून गावात सर्रास दारुविक्री करीत आहे. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाच्या अधीन जात असल्याचे चित्र बघून गावातील संतप्त महिलांनी स्वतः या व्यक्तीच्या घरी जाऊन पोलिसांना दारू पकडून दिली. मात्र पोलिसांनी उलट याच महिलांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

गोंडपीपरी तालुक्यात गोजोली हे गाव आहे. येथील पोस्टमन म्हणून कार्यरत रघुनाथ कोटनाके हा शासकीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सर्रासपणे दारुविक्री करीत आहे. यामुळे गावातील युवा वर्ग व्यसनाकडे वळत असून यामुळे सामाजिक वातावरण गढूळ झाले आहे. यामुळे 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संतप्त झालेल्या महिलांनी ढाबा पोलीस स्टेशन गाठत ठाणेदार गोरक्षनाथ नागलोट यांना आरोपी कोटनाके याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, मात्र पोलिसांनी आपण दारू पकडा आम्ही कारवाई करतो असे सांगितले.

त्यामुळे महिलांनी कोटनाके याच्या घराकडे मोर्चा वळवला. यावेळी कोटनाके याने रोजंदारी करणारा व्यक्ती संतोष तुमराम याला राहण्यासाठी जे खोली आहे तिथे दारूच्या पेट्या आढळल्या. याची माहिती पोलिसांना दिली. दारूच्या 100 बाटल्या तिथे सापडल्या मात्र पोलीस पंचनामा न करता आरोपी संतोष तुमराम आणि रघुनाथ कोटनाके यांना घेऊन जात होते, यावेळी महिलांनी आक्षेप घेतल्यावर अखेर पंचनामा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) आणि 83 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

महिलांनी जबाबदार नागरिकाची भूमिका बजावली असताना आरोपीने खोटे आरोप करीत तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी याच सामान्य महिलांविरोधात भादवी कलम 143, 147, 149, 323, 504, 506, 427 अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद केली.

यामध्ये माया आत्राम, रेखा चौधरी, सुदर्शन मोहूर्ले, मंगला कोकोडे, अर्चना मोहूर्ले, नलिनी कोटरंगे, शारदा ठाकरे, वंदूशा सोनूले, रेखा वाढई, प्रेमीला शेडमाके, कांताबाई निकोडे, लक्ष्मी चौधरी, वर्षा मोहूर्ले, सारिका शेडमाके, शालू वसाके, कांता निवलकर, सारुबाई निकोडे, सपना चौधरी यांच्यासह गावातील होतकरू तरुणांचा समावेश आहे. जागरूक नागरिकांना असा त्रास दिला जात असेल तर सामान्य नागरिकांनी काय करायचे? पोलीस अधीक्षक साहेबांनी याकडे त्वरित लक्ष घालून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी केलं नाही अखेर महिलांनी केलं

गावातील कुठलीही गोष्ट लपत नाही. गोजोली गावात रघुनाथ कोटनाके अनेक वर्षांपासून सर्रासपणे अवैध दारुविक्री करत आहे, त्याच्या अवैध व्यवसायापायी
गावातील पुरुष मंडळी तर दारूच्या आहारी गेलेलीच आहे, मात्र बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले सुद्धा आता दारूच्या आहारी जाऊन आपले शैक्षणिक आणि संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याच्या मार्गावर लागले आहेत
यामध्ये गावातील महिलांची फार मोठी कौटुंबिक हानी आर्थिक हानी आणि सारे कुटुंब देशोधडीला लागण्याच्या मार्गावर लागले आहेत.
मात्र पोलिसांनी अद्याप त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. शेवटी गावातील महिलांना पुढाकार घ्यावा लागला.

जातीय रंग देण्याचा डाव
गावातील महिला ह्या मागासवर्गीय आहेत. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय महिलांचा समावेश आहे असे असताना आरोपीकडून याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निवेदन देताना डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांच्या मार्गदर्शनात निवेदन देण्यात आले व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच महिलांची व ग्रामस्थांची दिशाभूल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली, यावेळी गावातील माया आत्राम ग्रामपंचायत
सदस्य सरस्वती आत्राम, माजी सरपंच उज्वला दुर्गे,
मंगला कोकोडे, नलिनी कोटरंगे, सारिका कोटनाके,
शालीनी डोंगरे, वांदुशा सोनुले, कांता निवळकर, सुरेंद्र मांदाडे, रामदास ठाकरे, रामदास चौधरी, संजय चौधरी,
राकेश प्रधाने, राजेश डोंगरे इ. ग्रामस्थ उपस्थित होते.

याबाबत धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोरक्षनाथ नागलोत यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी सांगितले की महिलांनी दारू पकडली यात काही दुमत नाही त्यांनी चांगलं काम केलं, मात्र त्यांनी दारू पकडते वेळी कायदा हातात घ्यायला नको होता, ज्यावेळी महिलांनी दारू पकडली तेव्हा आम्हाला माहिती मिळाली, आम्ही तात्काळ गोजोली मध्ये जाऊन परिस्थिती हाताळली व दारूविक्री करणाऱ्याला अटक केली.

कायद्यानुसार आम्ही आरोपीवर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!