8 महिन्यात 310 नागरिकांना मोफत वकील

News 34

चंद्रपूर : न्यायालयाची पायरी चढू नये, असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. परंतु आपल्या अधिकारांसाठी आपल्याला न्यायालयात जावे लागते किंवा फौजदारी प्रकरणात समाविष्ट असल्यास उपस्थित राहावे लागते. आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तीने दाद मागण्यासाठी न्यायालयाची पायरी चढणे परवडणारे नसते. अशा दुर्बल घटकांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर धावून येते. निर्धारित पात्रता व निकष पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना प्राधिकरणामार्फत मोफत वकील दिला जातो. पैसे नाहीत म्हणून कोणीही न्यायापासून वंचित राहू नये, हा मोफत विधी सेवा योजनेचा उद्देश आहे.

मोफत वकील मिळण्यासाठी पात्र घटक :

महिला व 18 वर्ष वयापर्यंतची बालके, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरीक, कारागृहात किंवा पोलिसांच्या ताब्यात असलेले आरोपी, 3 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेला व्यक्ती, मानवी तस्करी, शोषण व वेठबिगारीचे बळी ठरलेले व्यक्ती, औद्योगिक कामगार, मनोरुग्ण व दिव्यांग व्यक्ती, पूर,भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती व जातीय हिंसा पिडीत व्यक्ती आदी घटक मोफत वकील मिळण्यासाठी पात्र आहेत.

मोफत वकील मिळण्यासाठी या ठिकाणी करा अर्ज :

सुविधेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथील कार्यालयात तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका न्यायालयात असलेल्या तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज करावा.

लोक अभिरक्षक कार्यालयाची निर्मिती :

फौजदारी प्रकरणात असलेले न्यायालयीन बंदी यांच्यासाठी मोफत विधी सहाय्य दिले जाते. वरील सुविधा मिळण्यासाठी अर्ज आल्यास लोक अभिरक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या पाच तज्ञ वकिलामार्फत मोफत विधी सहाय्य दिले जाते. सदर कार्यालय दि. 13 मार्च 2023 पासून जिल्ह्यात मुख्यालयासाठी कार्यरत आहे.

8 महिन्यात 310 नागरिकांना मोफत वकील :

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूरमार्फत माहे जानेवारी ते माहे ऑगस्ट 2023 या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील एकूण 310 नागरीकांना मोफत विधी सहाय्य पुरविण्यात आले, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी कळविले आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!