Thursday, April 25, 2024
Homeक्रीडातर होमगार्ड बंदोबस्तात दिसणार नाही - होमगार्ड संघटनेचा शासनाला इशारा

तर होमगार्ड बंदोबस्तात दिसणार नाही – होमगार्ड संघटनेचा शासनाला इशारा

पाच दिवसांत समस्या सोडवा अन्यथा गृहविभागाच्या सर्वच बंदोबस्तावर होमगार्ड संघटनेचा बहिष्कार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur
चंद्रपूर : राज्यात ४५ हजारांवर होमगार्ड कर्मचारी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून विविध उत्सवात बंदोबस्ताची जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, होमगार्ड कार्यालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. कोणतेही कारण नसताना कामावरून काढणे, वेतन उशिराने देणे, कारणे दाखवा नोटीस बजावणे असे प्रकार सुरू असून, अनेक मागण्याही शासनाकडे प्रलंबित आहे.

 

या सर्व समस्यांवर १५ सप्टेंबरपर्यंत तोडगा काढण्यात यावा, अन्यथा गृहविभागाच्या सर्वच बंदोबस्तांवर बहिष्कार घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

इंग्रज काळापासून राज्यात होमगार्ड ही संकल्पना असित्वात आहे. गृहविभागाच्या अंतर्गत हा विभाग असून, या विभागातील कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधनावर सेवा देत आहेत. होमगार्ड यांना ३६५ दिवस नियमित काम देण्यात यावे, बॉम्बे होमगार्ड ॲक्टमध्ये सुधारणा करण्यात यावी, पोलीस विभागाप्रमाणे होमगार्डसाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, होमगार्डला लोकसेवकाचा दर्जा देण्यात यावा, होमगार्डच्या पाल्यांना प्रशासकीय सेवाभरतीमध्ये अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यात यावी, होमगार्डच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्ष करण्यात यावे आदी २० मागण्यांसाठी होमगार्ड महासंघाने मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण आंदोलन केले होते.

 

यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी होमगार्डच्या मागण्यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शिष्टमंडळाची भेट घालून मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढू असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र, दहा दिवस लोटूनही अद्याप कोणतीही चर्चा होमगार्ड महासंघासोबत करण्यात आली नाही. त्यामुळे राज्यभरातील होमगार्डमध्ये आक्रोश आहे. १५ सप्टेंबरपर्यंत निर्णय घेण्यात यावा, अन्यथा आगामी सण, उत्सवाच्या बंदोबस्तात होमगार्ड सहभागी होणार असा इशारा देण्यात आला आहे.

 

होमगार्डच्या मुंबई कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी विजय पवार हे जिल्हा कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून होमगार्ड कर्मचाऱ्यांची पिळवूणक करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आली.

 

होमगार्ड वेल्फेअर फंडात ८ कोटींचा निधी असून, हा निधी होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी असताना त्या निधीचा कर्मचाऱ्यांसाठी वापर केला जात नाही, असा आरोपही यावेळी डॉ. प्रतापराव मोहिते पाटील यांनी केला आहे. पत्रकार परिषदेल चैतन्य मासूरकर, वीरेंद्र उके, राम बेलसरे, निखिल करवाडे, आर.एम. मोडक, विनोद गुनशेट्टीवार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!