News34 obc vs maratha
चंद्रपूर – 11 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या आमरण उपोषणाचा 12 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावल्याने प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे.
जातनिहाय जनगणना, ओबीसी वसतिगृह, स्वाधार योजना अश्या विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी 11 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
त्यानंतर 17 सप्टेंबर ला ओबीसी संघटनांचा महामोर्चा काढण्यात आला होता, मात्र टोंगे यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी साधी दखलही घेतली नसल्याने आता आंदोलनाचे काय होणार? हा मोठा प्रश्न ओबीसी संघटनांना पडला आहे.
टोंगे यांच्या आंदोलनाला विविध संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे, 21 सप्टेंबरला भारत राष्ट्र समितीने टोंगे यांच्या आंदोलनाला समर्थन जाहीर केले.
भारत राष्ट्र समितीने दिला टोंगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा
मागील 11 दिवसांपासून ओबीसी शेतकरी पुत्र रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे. ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाला भारत राष्ट्र समिती जिल्हा चंद्रपूर तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये.महाराष्ट्र शासनाने बिहार सरकारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी. OBC विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरू करण्यात यावी या सर्व रास्त व प्रमुख मागण्यासाठी मागील 11 दिवसापासून रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेले आहे.
भारत राष्ट्र समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज आंदोलन स्थळी भेट देत रवींद्र टोंगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत चर्चा केली याप्रसंगी सचिन भाऊ राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपस्थित होते. ओबीसी समाजातील सामाजिक कार्यकर्ते व भारत राष्ट्र समिती राजुरा विधानसभाचे नेते भूषण फुसे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महाराष्ट्र शासन हे OBC समुदायाबद्दल उदासीन आहे.
भूषण फुसे असेही म्हणाले की शांतता प्रिय OBC समुदायाला महाराष्ट्र शासन गांभीर्याने घेत नाही आणि म्हणूनच 11 दिवस लोटूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. OBC समुदाय संघर्ष करायला तयार आहे आणि पुढे परिस्थिती चिघळल्यास महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी भारत राष्ट्र समितीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक वंमशी श्रीकृष्ण अरकिल्ला, अशोक पोरेड्डीवार राकेश चिल्कुलवार, सनी रेड्डी, महेंद्र ठाकूर, प्रदीप येरकल्ला, मनोहर डोरलीकर सुनील ठाकूर, गणेश चौधरी, प्रवीण आरापल्ली सोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.