News34 chandrapur
चंद्रपूर – नवरात्रोत्सवाची मोठ्या प्रमाणात तयारी सुरू झाली आहे. उत्सव साजरा करा, पण जरा सांभाळून! विजेपुढे चूकीला माफी नाही. आत्मविश्वास किंवा नजर अंदाजाने झालेली एखादी छोटीसी चुकही आपल्या उत्सवावर वीरजन घालू शकते. सजगता हिच सुरक्षा आहे. त्यामुळे सुरक्षेला प्राधान्य देत अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
मंडप आणि संच मांडणी
सुरक्षेला प्राधान्य देत मंडपाची रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घेणे आवश्यक आहे.
दुर्गोत्सव मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तुंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात तसेच स्वीचबोर्डच्यामागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.
सुरक्षित अंतर राखावे
महावितरणच्या यंत्रणेकडून उत्सव काळात ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा होण्यासाठी पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. दुर्गोत्सव मंडळांनी मंडप टाकतांना वितरण रोहित्रे ( ट्रान्सफॉर्मर), विद्युत खांबास ताण दिलेली तार भूमिगत वाहिनीचे फिडर पिलर यापासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे.
भक्तांनी व मंडळ कार्यकर्त्यांनी विद्युत खांब, रोहित्रे, फिटर पिलर इत्यादी वर चढू नये, मिरवणूकीत लोखंडी / धातूच्या रॉडच्या झेंड्याचा वाहनात किंवा वाहनाच्या टपावरील कार्यकर्त्यांचा विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी.
घरगुती दराने वीज पुरवठा
■ उत्सवासाठी घरगुती दरानेच वीज पुरवठा होणार असल्याने अधीकृत जोडणी घ्यावी. दुर्गोत्सव मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
स्वतंत्र न्युट्रल घेणे गरजेचे
■ उत्सवादरम्यान वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते.
झेंडे फिरवताना काळजी घ्या…
■ मूर्ती स्थापनेच्या दिवशी तसेच विसर्जनाच्या दिवशी मिरवणूकीत झेंडे फिरवताना काळजी घ्यायला हवी. उत्साहाच्या भरात झेंड्याचा स्पर्श विद्युत तारांना होणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा लोखंडी किंवा मेटल रॉड लावलेला असतो. या रॉडमधून विजेचा धक्का बसण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे लाकडी काठी बसवावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.