News34 chandrapur
मालेगाव/वाशीम – शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे 54 वर्षीय जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता शाळेत जाण्यासाठी निघाले, मात्र वाटेत अज्ञातांनी शिक्षकांवर पेट्रोल टाकत जिवंत जाळले, या घटनेत शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच दहशत पसरली आहे.
बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक 54 वर्षीय दिलीप धोंडूजी सोनुने हे नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी सकाळी 10 वाजता निघाले होते, ते आपल्या दुचाकी वाहन क्रमांक Mh37 y 1438 शाळेत जाण्यासाठी निघाले मात्र वाटेत त्यांचा मृत्यू उभा होता हे त्यांनाही माहीत नव्हते.
4 किलोमीटर अंतर गाठल्यावर कोलही गावाजवळ अज्ञात हल्लेखोर मास्तरांची वाट बघत होते, सोनुने त्या ठिकाणी पोहचताच त्यांच्या डोक्यावर प्रहार करण्यात आला, अचानक झालेल्या या हल्ल्याने सोनुने दुचाकी वाहनवरून खाली कोसळले, गंभीर अवस्थेत ते जीव वाचविण्याचा आक्रोश करू लागले मात्र हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकत जिवंत जाळले.
नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली, पोलीस व तहसीलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, गंभीर अवस्थेत असलेल्या सोनुने यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान शिक्षक सोनुने यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे, मात्र सोनुने यांच्यावर हल्ला का करण्यात आला यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.