News34 chandrapur
चंद्रपूर/पोम्भूर्णा – पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथील आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे पुतळे व झेंडा हटविल्यावरून मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचे रुपांतर कार्यालयाचे तोडफोड होण्यापर्यंत गेल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याने सध्या हे प्रकरण तापले आहे.
सध्या आंदोलनस्थळाला पोलीस छावणीचे रूप आले असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमधून अधिकारी व कर्मचारी पोम्भूर्णा येथे दाखल झाले आहे.
सध्या वनविभाग, महसूल व पोलीस विभागाने आंदोलकांची भेट घेऊन समजविण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलकांनी प्रशासनाला वेठीस धरून ठेवले आहे.
याबाबत वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही 2 दिवसांपूर्वी आंदोलकांशी चर्चा केली, त्यांच्या सर्व मागण्या सुद्धा मान्य केल्या परंतु आंदोलकांच्या मागण्या शासन नियमानुसार पूर्ण कराव्या लागणार याबाबत सर्वाना याची माहिती दिली मात्र आंदोलक मागे हटायला तयार नाही.
20 ऑक्टोबर ला आदिवासी समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली, एसडीओ व होमगार्ड ला सुद्धा यामध्ये किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती आहे, सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे यांना नागपुरातील अर्नेजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आदिवासी आंदोलनाच्या हिंसक वळणानंतर सुद्धा पोलीस प्रशासन कमालीचे संयम दाखवीत आहे, आंदोलनस्थळी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त लावला असून सध्या प्रशासनाने आदिवासी बांधवांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.