News34 chandrapur
चंद्रपूर : बल्लारपूर ग्रामीण रुग्णायात प्रसूतीसाठी गेलेल्या महिलेवर स्थानिक डॉक्टरांनी निष्काळजीपणे उपचार केले असून, सिझर केलेल्या ठिकाणचे टाके खुलल्याने महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. त्यामुळे पीडित महिलेवर चंद्रपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार करावे लागले. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकीत्सक आणि बल्लारपूर पोलीस ठाण्यात डॉक्टरांविरोधात निष्काळजी केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई संबंधित डॉक्टरांवर करण्यात आली नाही.
२५ ऑक्टोबरपर्यंत या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा पीडित महिलेची बहीण प्रज्ञा कडूकर, सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
दीपा संपत पेरकर या महिलेला प्रसूतीसाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. सिझर करून प्रसूती करण्यात आली. यानंतर पाच दिवसाने तिची रुग्णालयातून सुटी करण्यात आली. परंतु, या कालावधीत तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही. घरी गेल्यानंतर सिझरचे टाके खुलून तिची प्रकृती गंभीर झाली. यानंतर तिला परत रुग्णालयात नेले असता तिन्ही डॉक्टरांनी हात वर केले.
या प्रकरणात डॉ. मृणाल, डॉ. डोंगरे, डॉ. रामटेके यांनी निष्काळजीपणी केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. परंतु, कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. डॉ. मृणाल या बल्लारपुरातील काँग्रेस नेत्याच्या कुटुंबातील असल्याने त्यांच्यावर कारवाई टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
दरम्यान, या तिन्ही डॉक्टरांवर जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच चौकशी करून त्यांची वैद्यकीय सेवा निलंबित करण्यात यावी, अन्यथा २५ ऑक्टोबरपासून अन्नत्याग आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला राजेश बेले, प्रज्ञा कडूकर, पीडित महिलेचा भाऊ उमेश नगराळे उपस्थित होते.