Monday, May 27, 2024
Homeग्रामीण वार्ताअखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

अखेर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाकडून सरपंच संघटनेच्या मागण्या मान्य

सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, बाळकृष्ण काकडे यांच्या आमरण उपोषणाला यश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

कोरपना (चंद्रपूर) : –  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी १६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले. तब्बल तीन दिवसानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली असताना गावातील व्यापारीमंडळ विविध पक्ष, सामाजिक संघटना व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अल्ट्राटेक कंपणी प्रशासन नरमले. कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.

 

शिष्टमंडळात नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, पत्रकार प्रमोद वाघाडे, हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे, सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे, चंदू राऊत उपस्थित होते. सरपंच संघटनेच्या मागण्यांची भूमिका स्पष्ट करुन कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिले. काल (ता.१८) रात्री १० वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपव्यवस्थापक नारायणदत्त तिवारी व सतीश मिश्रा यांनी उपोषणकर्ते रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांना लिंबू पाणी पाजून लेखी पत्र देत आमरण उपोषण सोडवले. नांदा, बिबी, आवाळपूर, हिरापूर, सांगोडा, भोयगाव, बाखर्डी, तळोधी, नोकारी, पालगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

 

या मागण्या केल्या मान्य

अल्ट्राटेक सिमेंट कंपणी अंतर्गत दत्तक गावात सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) संबंधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून कामे केली जातील. दत्तक गावातील आयटीआय व तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. पोलीस व सैन्य भरती तयारीसाठी कंपणीतील मैदान दत्तक गावातील मुलांना उपलब्ध करण्यात येईल. दरवर्षी गावातील मुख्य रस्त्यांवर होणारा कचरा स्वच्छतेसाठी मशीन उपलब्ध करण्यात येईल. दत्तक गावातील कुठल्याही दुर्घटनेत रुग्णवाहिका व अग्निशमन यंत्र कंपणीकडून उपलब्ध करण्यात येईल.

 

आंदोलनातील या कृतीने अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले

आंदोलनात दहा गावातील सरपंच व लोकप्रतिनिधी एकत्र येत धरणे व उपोषण केले. विविध राजकिय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष सतीश बिडकर यांनी रक्तांनी पत्र लिहीले. संतप्त गावक-यांनी कंपणीविरोधात मुंडन केले. ‘मी माझ्या गावासाठी’ असे फलक गावक-यांनी लावले. सिमेंट कंपणींच्या अधिका-यांना दत्तक गावांनी गावबंदी केली. आंदोलनाची तिव्रता वाढल्याने अखेर ६ दिवसानंतर अल्ट्राटेक प्रशासन धास्तावले व आंदोलनस्थळी येत मागण्यांची पुर्तता केली.

 

अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर विरोधात करण्यात आलेल्या आमरण उपोषणानंतर कंपनी प्रशासनांनी मागण्या मान्य केल्या. या मागण्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासोबतच गावकऱ्यांसह कामगार, गावातील तरुणांच्या रोजगाराबाबत दत्तक गाव सरपंच संघटना कंपनी प्रशासनाकडे आग्रही आहे. सदर मागण्यांकडे कंपनी प्रशासनांने दुर्लक्ष केले तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

– रत्नाकर चटप
जिल्हा सचिव, अ.भा.सरपंच परिषद तथा ग्रा.पं.सदस्य नांदा

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!