News34 chandrapur
चिमूर – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी येथे पतीने आपल्या चौथ्या पत्नीची किरकोळ वादात दगडाने ठेचून हत्या केली, ही घटना शुक्रवारी रात्री 24 नोव्हेम्बरला घडली, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली, मात्र या हत्याकांडात 2 मुली आईविना पोरक्या झाल्या.
नगरपंचायत भिसी प्रभाग क्रमांक १७ येथील आरोपी सोमेश्वर रामा बानकर वय ४९ वर्षे याने किरकोळ भांडणातून दगडाने पत्नीच्या डोक्यावर व छातीवर वार करीत झोपेतच निर्घुण हत्या केली. व मृतदेह कपड्याने झाकून ठेवला.
सदर दुर्दैवी घटना शुक्रवारच्या मध्यरात्रीनंतर घडलेली आहे. शनिवारला सकाळी सहा वाजता चे सुमारास ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. भिसी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली.
हत्या झालेल्या पत्नी चे नाव करूणा उर्फ शितल सोमेश्वर बानकर वय २७ वर्षे आहे. मृतक शितलचे सासर व माहेर भिसी येथीलच आहे. आरोपी सोमेश्वर बाणकर याची मृतक करुणा उर्फ शितल ही चौथी पत्नी असून पहिल्या व तिसऱ्या पत्नीचा घटस्फोट झालेला होता. यातील दुसरी पत्नी एकाएकी मरण पावली होती तर चौथ्या पत्नीची सोमेश्वर ने निर्घुण हत्या केली.
मृतक करुणाच्या वडीलाने पोलीस स्टेशन भिसी येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली. मृतदेह उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले. नंतर माहेरी भिसी येथे करुणा वर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक करुणा उर्फ शितलच्या पश्चात दोन व सात वर्षे वयाच्या दोन मुली आहेत. वडिलांनी आईची हत्या केल्यामुळे दोन्ही चिमुकल्या आईविना पोरक्या झालेल्या आहेत. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर राकेश जाधव यांचे मार्गदर्शनात भिसीचे ठाणेदार प्रकाश राऊत यांचे नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जंगम करीत आहेत. सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.