News34 chandrapur
चंद्रपूर : प्रियदर्शनी चौक,कामगार चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, एसटी वर्कशॉपजवळील शहीद भगतसिंग चौक आणि रामाळा तलावातील फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या सव्वादोन कोटींच्या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची बाब जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी उजेळात आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान सोमवारी त्यांनी या घोटाळ्याची तक्रार जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग तसेच एसीबीकडे केली असल्याने आता या घोटाळ्यातील मोठे मासे गळाला लागणार आहेत.
पाच फाउंटेन उभारणीसाठी मनपाने १७ फेब्रुवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. नागपूर येथील प्रशांत मद्दीवार यांच्या एजन्सीकडे फाउंटेन उभारणी व बांधकामाचे काम दिले. या एजन्सीकडे पुरेसा अनुभव नसल्याने जाणीवपूर्वक प्रशांत मद्दीवार या एजन्सीसाठी सोयीच्या अटी-शर्ती निविदेत टाकण्यात आल्या. जॉइंट व्हेंचरची तरतूद केली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालय किंवा महामंडळामध्ये निविदेतील कामाच्या किमतीच्या ८० टक्के काम किंवा ५० टक्के दोन काम किंवा ४० टक्के तीन कामे पूर्ण केल्याचा अनुभव असणे आवश्यक असतानाही मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांनी नियम पायदळी तुडवले. केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशाचे सरसकट उल्लंघन केले.
काम पूर्ण केल्याचे अनुभव प्रमाणपत्र नसतानाही प्रशांत मद्दीवार या कंत्राटदाराला पात्र ठरवले. चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून ,अवास्तव दर टाकून तसेच पात्र असलेल्या कंत्राटदाराला टाळून मर्जीतील कंत्राटदारला काम देऊन आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप या प्रकरणात झालेला आहे. याबाबत संपूर्ण कागदपत्रासह जनविकास सेनेचे जिल्हाध्यक्ष पप्पु देशमुख यांनी जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मनपाचे आयुक्त बिपिन पालीवाल व या घोटाळ्याशी संबंधित इतर अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वठणीवर आणणार
चंद्रपूर शहरातील नागरिक धुळीच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. या धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत निधी प्राप्त झाला.या निधीतून अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला. प्रदूषणाने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्याच्या हेतूने शुद्ध हवेसाठी किंवा धूळ नियंत्रणाच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना न करता केवळ मर्जीतील कंत्राटदारासाठी फवारे लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घेणे आम्ही सुरू केले आहे.त्यांना वठणीवर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा जनविकास सेनेचा इशारा आहे.