News34 chandrapur
भद्रावती:- भारतातील जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागात विखुरली असून शासनातर्फे त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ प्रत्येकाला मिळावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देषानुसार विविध विभागाचा आढावा घेण्यासाठी दि. 17 जानेवारी 2024 रोजी स्वागत सेलिब्रेशन येथे वार्षिक आमसभेचे आयोजन पंचायत समिती भद्रावती यांच्या मार्फत करण्यात आले होते. यावेळी तालूक्यातील शासनाच्या विविध विभागाच्या कामाचा आढावा आ. प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
शासनातर्फे देण्यात येणारा निधी व त्यातून होणारे विकास कामे वेळेवर झाले पाहिजे यासाठी या आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरीकांपर्यंत पोहचतो कि नाही याचा देखील आढावा घेण्यात आला. यावेळी आ. प्रतिभाताई धानोरकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरीकांना वेळेवर मिळाला पाहीजे. तसेच शेवटच्या घटकांना देखील शासनाच्या माध्यमातून न्याय देण्याकरीता आपण कटीबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी सन 2021-2022 व 2022-23 या दोन वर्षातील चालू असलेल्या विकास कामांवर देखील चर्चा केली. त्यासोबतच गावातील सरपंच व नागरीकांना येण्याऱ्यां समस्यांचे निराकरण तातडीने करावे असे निर्देश विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
या सभेच्या बैठकीला मंचावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मीना सांळुके, गट विकास अधिकारी सपकाळ, सहाय्यक गट विकास अधिकारी सावसाकडे तसेच भद्रावती तालुका शहर कॉग्रेस चे अध्यक्ष सुरज गावंडे, भद्रावती ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजणे, पंचायत समिती माजी सभापती प्रविण ठेंगणे, सुधीर मुळेवार, पंचायत समिती माजी उपसभावती भोजराज झाडे, सरंपच संघटनेचे अध्यक्ष नयन जांभुळे, राजु डोंगे, महेश मोरे यासह सर्व गावातील सरपंच, उपसरपंच, इत्यादी पदाधीकारी व शासकीय विभागातील कर्मचारी उपस्थित होते.