Big Accident : काम आटोपून ते घराकडे येत होत्या पण मध्येचं घडलं भीषण

News34 chandrapur

चंद्रपूर : ब्रम्हपूरी शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माहेर या गावातून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी गेलेल्या १७ महिला सुमो गाडीतून काम आटोपून परतत असताना, उमरेड तालुक्यातील सिर्सीजवळ काल गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाहन उलटल्याने तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. चालकासह १४ महिला गंभीर जखमी झाल्या.

 

ब्रह्मपुरी शहराजवळील माहेर येथील १७ महिला गेल्या काही दिवसांपासून वर्धा जिल्ह्यात चणा कापणीसाठी जात होत्या. याकरीता महिलांनी सुमो वाहन भाड्याने घेतले होते. ते वाहन महिला कामगारांना दररोज ने आण करीत होते. काल गुरूवारी चालकाने माहेर गावातून पहाटेला १७ महिलांना सुमो वाहनात बसून पिंपरी गावी चना कापणीला घेऊन गेला होता. दिवसभर चणा कापणीच्या कामानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास उमरेड तालुक्यातील सिर्शी जवळ परत येत असताना महिलांचे वाहन उलटून गंभीर अपघात झाला.

 

 

अपघातामध्ये रत्नमाला मेश्राम, इंदिरा महाजन, रसिका बागडे या महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर तनवी विनोद मेश्राम, दुर्गा विजय आडकिने, संगीता देविदास आडकिने, वीणा विक्रांत अडकिने, सोनाबाई सिद्धके, संध्या संतोष बागडे, सरिता विजय नागापुरे, मनोरथा शांताराम मेश्राम, राजश्री राजेश्वर मेश्राम, बेबी ईश्वर मेश्राम, जनाबाई अर्जुन बावणे, अश्विनी अरविंद बागडे या महिलांसह वाहन चालक शंकर प्रभाकर मसराम (३०) रा. जांभुळघाट गंभीर जखमी झाला.

 

घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वारजुकर यांनी घटनास्थळ गाठून मदत कार्याला सुरुवात केली. एका रुग्णवाहिकेतून तीन महिलांचे शव उमरेड येथे पाठविण्यात आले. उर्वरित जखमींना चार रुग्णवाहिकेतून नागपूर येथे हलविण्यात आले असून स्वतः सतीश वारजुकर जखमी सोबत नागपूरला गेले आहेत. घटनेने माहेर गावात शोककळा पसरली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!