चंद्रपूर: (Chandrapur Credit Scam) प्रकरणामुळे चंद्रपूरच्या सहकारी क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर रोडवरील श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २ कोटी ४९ लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला आहे. वैधानिक लेखापरीक्षणात बनावट नोंदी, बोगस व्हाउचर्स आणि ठेवीदारांच्या पैशांचा अपहार समोर आला. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी माजी अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक आणि अभिकर्त्यांसह १६ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
सहकारी क्षेत्राला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली असून, येथील नागपूर रोडवर असलेल्या ‘श्री साई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये’ २ कोटी ४९ लाख आठ हजार नऊशे एकोणपन्नास रुपये (सुमारे २.४९ कोटी) रुपयांचा प्रचंड आर्थिक गैरव्यवहार आणि अपहार झाल्याचे समोर आले आहे. (न्यायालयातून बाहेर पडताच पुन्हा एमडी ड्रग्स ची विक्री, पोलिसांनी केली अटक)
Chandrapur Credit Scam प्रकरणात २.४९ कोटींचा अपहार कसा उघड झाला?
याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात पतसंस्थेचे माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, तत्कालीन व्यवस्थापक आणि अभिकर्त्यांसह एकूण १६ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ जून २०२६ रोजी रात्री उशिरा ११:३१ वाजता या संदर्भात पोलीस ठाण्यात अधिकृत प्रथम खबरी अहवाल (एफआयआर क्र. ०८८२/२०२६) नोंदवण्यात आला असून पोलीस निरीक्षक प्रभावती त्र्यंबक एकुरके यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
हा संपूर्ण गैरव्यवहार प्रामुख्याने सन २०२३ ते २०२५ या आर्थिक वर्षांच्या कालावधीत घडला असून, काही थकीत कर्ज प्रकरणांचे धागेदोरे अगदी २००४ पासूनचे आहेत. या पतसंस्थेचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांनी विशेष आदेश जारी केले होते. त्यानुसार सहकारी संस्थेचे श्रेणी-२ चे लेखापरीक्षक संदीप जयदेव भानसे यांनी पतसंस्थेच्या १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहारांची कसून तपासणी आणि वैधानिक Audit केले. या चौकशीदरम्यान आणि त्यांनी सादर केलेल्या विनिर्दिष्ठ अहवालातून पतसंस्थेतील अंतर्गत लबाडी, बनावट नोंदी आणि कोट्यवधी रुपयांची अफरातफर अत्यंत स्पष्टपणे उघड झाली. सहाय्यक निबंधकांच्या निर्देशानंतर लेखापरीक्षक संदीप भानसे यांनी स्वतः या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. (वरोरा टी-पॉइंटवर एलसीबी ची कारवाई, विदेशी मद्यसाठा केला जप्त)
लेखापरीक्षणातून समोर आलेले अपहाराचे स्वरूप अत्यंत धक्कादायक आणि सुनियोजित असल्याचे दिसते. आरोपींनी संस्थेच्या रोख पुस्तकात (कॅशबुक) आणि संगणकीय प्रणालीमध्ये जमा पावत्यांच्या रकमांच्या नोंदीच घेतल्या नाहीत. याशिवाय, जमा-खर्चाच्या बाजूला खोट्या आणि बनावट ट्रान्सफर नोंदी करून लबाडीने व्यवहार करण्यात आले, तसेच अनेक बोगस व्हाउचर्स तयार करून संस्थेच्या पैशांची विल्हेवाट लावली गेली.
ढोबळमानाने पाहिल्यास, सभासदांच्या मुदत ठेवी परत करताना एकाच व्यक्तीला (समराज सिंग अरोरा) दोनदा पैसे देऊन ९४,७०० रुपयांचा चुना लावण्यात आला, तर दैनिक ठेव संकलनात २२,४०० रुपयांची अफरातफर झाली. सर्वात मोठी गंभीर बाब म्हणजे, तब्बल ५५ लाख ४० हजार ३२६ रुपयांचे थकीत सभासद कर्ज नियमबाह्य पद्धतीने येणे दाखवण्यात आले आहे आणि तब्बल १ कोटी ७० लाख ३९ हजार ३२० रुपयांच्या सभासद ठेवींची देणी थकवून सर्वसामान्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
या महाअपहार प्रकरणात पोलिसांनी ज्या १६ जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे, त्यात पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने सुरेश बाबूराव धानोरकर, मनश्री गिरीश अंबाडे, दिलीप सिताराम कडू, सागर श्रीकांत भट्टलवार, प्रकाश गोपाळकृष्ण देशकर, पुरुषोत्तम जगन्नाथ डे, दत्तात्रय अनंता उर्फ जनार्दनपंत घरोटे, नामदेव मारोतराव निकोडे, वासुदेव रामजी सावसाकडे, वासुदेव जोंदळू बांगडवार, प्रकाश बनकर, संदीप महाजन, विक्रम ब्राम्हणे, सीमा सुरेश धानोरकर (अभिकर्ता) यांच्यासह २००४ ते २०२५ आणि २०२० ते २०२५ या काळातील संचालक मंडळाचा समावेश आहे.
पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३१६(५) (विश्वासघात), ३१८(४) (फसवणूक), ३३६(२), ३३६(३), ३३८ (बनावट दस्तऐवज तयार करणे), ३४०(२) आणि ६१(२) (गुन्हेगारी कट रचणे) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहकार क्षेत्रातील या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






