Chandrapur Electrocution Accidents Monsoon Safety

चंद्रपूर जिल्ह्यात वीज धक्क्याने दोघांचा मृत्यू; महावितरणचे पावसाळी सुरक्षेबाबत आवाहन

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 15, 2026

चंद्रपूर : (Chandrapur Electrocution Accidents) मुळे चंद्रपूर जिल्ह्यातून दोन अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. पावसाळा सुरू होताच विजेच्या अपघातांमध्ये वाढ झाली असून, मुरमाडी येथील एका युवकाचा आणि टेकडीटोला येथील एका महिलेचा विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या दुर्घटनांनंतर महावितरण खडबडून जागे झाले असून त्यांनी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सुरक्षा सूचना जारी केल्या आहेत. (प्रदीर्घ कालावधीनंतर चंद्रपूर वाहतूक नियंत्रक शाखा जागी)

Chandrapur Electrocution Accidents : एकाच दिवशी दोन मृत्यू

पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप खुलते, पण याचसोबत विजेच्या अपघातांचा धोकाही वाढतो. वीज डोळ्यांना दिसत नसली तरी तिचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. बुधवारी दुपारी चामोर्शी मार्गावरील मुरमाडी येथील रहिवासी श्री. अरविंद जगदीश भोपये या युवकाचा गिझर दुरुस्त करीत असताना वीजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला तर कुरखेडा तालुक्यातील टेकडीटोला येथील प्रभा दिनकर मडकाम या महिलेचा तारावर ओले कपडे वाळत घालतांना वीजेचा धक्का लागल्याने मृत्य झाला. अशा घटना टाळण्यासाठी तुमच्या आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी महावितरणने काही अत्यंत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पावसाळ्यात होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी या नियमांचे पालन करणे करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

घरात सुरक्षित राहण्यासाठी सर्वप्रथम ओल्या हातांनी विजेची उपकरणे किंवा स्विचबोर्डला स्पर्श करणे टाळा. घरातील मीटरजवळ पाणी झिरपत असल्यास तात्काळ मेन स्विच बंद करा. मेन स्विचमध्ये तांब्याची तार वापरण्याची चूक करू नका, त्याऐवजी अधिकृत अल्युमिनियम अलॉय फ्यूज वायरचाच वापर करा. जुनी वायरिंग धोकादायक ठरू शकते, त्यामुळे परवानाधारक कंत्राटदाराकडून वायरिंगची तपासणी करून घ्या. मिक्सर, हिटर किंवा फ्रिजसारख्या उपकरणांसाठी नेहमी थ्री-पिन सॉकेट वापरा, जेणेकरून अर्थिंगची सुविधा मिळेल. भिंत किंवा उपकरणांना स्पर्श करताना झिणझिण्या जाणवत असतील, तर हे धोक्याचे लक्षण आहे, अशा वेळी तातडीने दुरुस्ती करा. घरात ईएलसीबी (ELCB), आरसीसीबी (RCCB) किंवा एमसीबी (MCB) बसवणे अत्यंत सुरक्षिततेचे ठरते. याशिवाय, वीज चमकताना उपकरणे बंद करून प्लग सॉकेटमधून काढून ठेवणे केव्हाही चांगले.

घराबाहेरही तितकीच काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा आणि खांबांपासून सुरक्षित अंतर राखा. खांबांना जनावरे बांधणे किंवा दुचाकी टेकवणे टाळा. लोखंडी तारांवर कपडे वाळवू नका, विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, कारण पत्रा विजेचा उत्तम वाहक असतो. वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नका, कारण यामुळे प्राणी आकर्षित होऊन शॉर्टसर्किटचा धोका वाढतो.

\पावसाळ्यात इन्सुलेटर तडकणे, झाडे कोसळणे किंवा पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. अशा तांत्रिक बिघाडाच्या वेळी महावितरण तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा काही धोकादायक परिस्थिती आढळल्यास ग्राहक महावितरणच्या मोबाईल ऍपवर, www.mahadiscom.in या संकेतस्थळावर किंवा 1800-233-3435, 1800-212-3435 किंवा 1912 या टोल-फ्री क्रमांकावर 24 तास संपर्क साधू शकतात. ज्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदणीकृत आहेत, ते 022-50897100  क्रमांकावर मिस कॉल देऊ शकतात. तसेच ‘NOPOWER’ स्पेस आणि 12 अंकी ग्राहक क्रमांक 9930399303 या क्रमांकावर पाठवून तक्रार नोंदवता येते.

 या पावसाळ्यात आपण सर्वांनी जागरूक राहून नियमांचे पालन केले, तर निश्चितच विजेच्या धोक्यांपासून सुरक्षित राहू शकतो. नागरिकांची सुरक्षा हीच महावितरणची प्राथमिकता आहे, त्यामुळे सुरक्षिततेला प्राधान्य द्या!, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment