Chandrapur Gutkha Mafia : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात प्रतींबंधित सुगंधित तंबाखू विक्री करीत युवा पिढीला कॅन्सर सारख्या आजाराच्या खाईत ढकलणारे तंबाखू माफियांवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी मिनी मकोका अंतर्गत कारवाई केली आहे, यामुळे सुगंधित तंबाखू माफियांचे धाबे दणाणले आहे.
वर्ष २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू वर बंदी लावली होती, मात्र त्यानंतर अनेक माफियांचा उदय झाला, आणि सुगंधित तंबाखूची वाहतूक इतर राज्यातून सुरु झाली, मागील १४ वर्षांपासून जिल्ह्यात सुगंधित माफिया सक्रिय आहे, आजवर या माफियांवर अनेक कारवाया झाल्या मात्र आज खऱ्या अर्थाने चंद्रपूर पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. (चंद्रपुरात १६८ ग्राम एमडी पावडर जप्त)
Chandrapur Gutkha Mafia वर मिनी मकोका का लागू झाला?
चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू पदार्थाच्या अवैध व्यापाराविरुद्ध सुरु असलेल्या कारवाईत संघटित गुन्हेगारी अन्वये कलम १११ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील टोळी प्रमुख वसीम अख्तर झिमरी राहणार घुटकाला वॉर्ड चंद्रपूर व सिद्धांत माधव गोंडाणे आणि मोहम्मद अखिल शकील शेख यांच्याविरुद्ध यापूर्वी अनेक कारवाया करण्यात आल्या होत्या.
यासह बल्लारपुरातील तंबाखू माफिया टोळी प्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर राहणार बल्लारपूर तसेच अजयकुमार विजयकुमार गुंडोजवार यांच्याविरुद्ध अनेक कारवाया करण्यात आल्या ज्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व पान मसाला जप्त करण्यात आला होता.
तपासादरम्यान टोळी प्रमुख व सदस्यांविरोधात चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली व इतर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यामध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अनव्ये अनेख गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी आपल्या आर्थिक फायद्यासाठी संघटित पद्धतीने गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कलम १११ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले.
याप्रकरणातील आरोपी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यावर सध्या हायकोर्टात त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात तपासी अधिकारी पोउपनि हिराचंद गव्हारे व सपोनि सचिन राखोंडे यांनी पूर्ण केली.
चंद्रपूर पोलिसांनी केलेली ही कारवाई प्रतिबंधित तंबाखू व्यापाराविरोधातील महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. संघटित गुन्हेगारीविरोधातील ही कारवाई भविष्यात अशा टोळ्यांवर मोठा प्रतिबंध ठरू शकते.