चंद्रपूर: अजयपूर गोवंश तस्करी रोखण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला यश आले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ नोव्हेंबर २०२६ रोजी १८ चाकी ट्रेलर अडवण्यात आला. पोलिसांनी ५७ गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली. वाहतुकीदरम्यान ९ जनावरांचा मृत्यू झाला, तर ४८ जनावरांना सुखरूप मुक्त करण्यात आले. एका आरोपीला अटक झाली असून तिघे फरार आहेत.
अजयपूर गोवंश तस्करी: पोलिसांनी सापळा कसा रचला?
जिल्ह्यात गोवंशीय जनावरांच्या अवैध आणि क्रूर वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने मोठी धडक कारवाई करत ५७ गोवंशीय जनावरांची वाहतूक रोखण्यात यश मिळवले आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात सापळा रचून एका १८ चाकी ट्रेलर ट्रकमधून अत्यंत अमानुष पद्धतीने नेण्यात येणारी ही जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, या अमानुष वाहतुकीत तब्बल ९ जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर ४८ जनावरांना सुखरूप मुक्त करण्यात आले आहे. (घरातच थाटला दारूचा कारखाना, सिंदेवाही पोलिसांची कारवाई, वाचा बातमी)
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजयपूर परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयित १८ चाकी ट्रेलर ट्रक अडवला आणि तपासणी केली. या ट्रकमध्ये एकूण ५७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने कोंबून ठेवलेली आढळून आली. धक्कादायक बाब म्हणजे, या जनावरांना आखूड दोराने बांधण्यात आले होते आणि त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. या अमानुष आणि क्रूर वाहतुकीमुळे ९ जनावरांचा जीव गेला, तर उर्वरित ४८ जनावरांना पोलिसांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. ताब्यात घेतलेल्या या जनावरांना पुढील उपचार, चारा-पाणी आणि देखभालीसाठी तात्काळ पडोली येथील प्यार फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण ३५ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ३० लाख रुपये किमतीचा ट्रेलर ट्रक, ५ लाख ७० हजार रुपये किमतीची ५७ गोवंशीय जनावरे आणि १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी घुग्घुस (ता. जि. चंद्रपूर) येथील रहिवासी नईमुद्दीन करिमद्दीन शेख (वय ४० वर्षे) या आरोपीला अटक केली आहे. तर मूर्तिजापूर (जि. अकोला) येथील रहिवासी असलेले इम्रान शेख, इर्शाद खान आणि मोहम्मद साकिब मोहम्मद शकूर हे तिघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
याप्रकरणी अटक व फरार आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम (सुधारित) २०१५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या (ब्रह्मपुरी उपविभाग) पथकाने ही कारवाई पार पाडली असून, या प्रकरणाचा पुढील अधिक तपास रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







1 thought on “चारा-पाण्याविना कोंबलेली ५७ जनावरे; ९ जनावरांचा मृत्यू, चंद्रपूर LCB ची कारवाई”