चंद्रपूर : Chandrapur Cattle Smuggling प्रकरणी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ७ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. स्थानिक गुन्हे शाखेने पद्मापूर परिसरात हा सापळा रचला होता. पोलिसांनी टाटा-२०७ वाहनासह ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. (हे हि वाचा – शिवीगाळ का केली म्हणून दोघांवर चाकू हल्ला)
दिनांक २१ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. दुर्गापूर हद्दीतील पद्मापूर मार्गे रहमतनगर येथे काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करण्याच्या हेतूने त्यांची अवैध आणि निर्दयपणे वाहतूक करत असल्याची पक्की बातमी मिळताच पथकाने तातडीने सूत्रे हलवली. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने मौजा पद्मापूर परिसरात सापळा रचून कडक नाकाबंदी लागू केली.
Chandrapur Cattle Smuggling प्रकरणी गुन्हे शाखेची कारवाई
नाकाबंदीदरम्यान संशयितरीत्या येणाऱ्या एका टाटा-२०७ वाहनाला रोखून त्याची बारीक पाहणी करण्यात आली. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये ५ गाई आणि २ बैल असे एकूण ७ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने, बांधलेल्या अवस्थेत कोंबून ठेवल्याचे निष्पन्न झाले. जनावरांचा अत्यंत निर्दयतेने छळ करत त्यांना कत्तलखान्याकडे नेले जात असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ वाहन आणि जनावरे आपल्या ताब्यात घेतली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांच्या सुरक्षेची आणि वैद्याकीय संगोपनाची व्यवस्था म्हणून त्यांना चंद्रपूर येथील ‘प्यार फाउंडेशन’ या गोशाळेत सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी १ लाख ५ हजार रुपये किमतीची ७ गोवंशीय जनावरे आणि ५ लाख रुपये किमतीचे टाटा-२०७ वाहन असा एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या अवैध वाहतूक प्रकरणी पोलिसांनी १) फिरोज युसुफ कुरेशी (रा. दुर्गापूर), २) शेख अश्फाक इमाम कुरेशी (रा. रहमतनगर) आणि ३) सादिक याकुब कुरेशी (रा. रहमतनगर, ता. जि. चंद्रपूर) या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५(अ), ९, ११; प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१)(घ), (ड), (च), (ज); भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम ३(५) तसेच मोटार वाहन अधिनियमाच्या कलम १७७ अन्वये विविध कलमान्वये रीतसर गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही यशस्वी आणि धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि मूल उपविभागाच्या पोलीस पथकाने पार पाडली असून, या कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






