Chandrapur Rahul Chaudhary Protest : चंद्रपूरमध्ये नगरसेवक राहुल चौधरी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन

नगरसेवक राहुल चौधरी यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरु

User avatar placeholder
Written by Prakash Hande

August 3, 2026

चंद्रपूर : Chandrapur Rahul Chaudhary Protest अंतर्गत चंद्रपूर शहरात राजकीय वातावरण तापले आहे. भानापेठ प्रभागाचे नगरसेवक राहुल चौधरी यांनी मनपा प्रशासनाच्या कथित भेदभावपूर्ण कारवाईविरोधात सोमवारपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी नागरिक, विविध पक्षांचे नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. अवैध बांधकामांवर समान न्यायाने कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनावर पक्षपाती व सूडबुद्धीने वागल्याचा आरोप केला. (हे हि वाचा – चंद्रपुरातील टाटा शोरूम फोडलं, एलसीबी ने गाठलं)

मनपा प्रशासनावर भेदभावपूर्ण कारवाईचे आरोप कोणते?

नगरसेवक राहुल चौधरी यांच्या घराच्या तथाकथित अवैध बांधकामावर तत्परतेने कारवाई करण्यास उत्सुक असलेल्या मनपा प्रशासनाचा दुटप्पी चेहरा आता पूर्णपणे उघडा पडला आहे. भानापेठ प्रभागातील बगड खिडकी रोड, पी.एच. नगर येथील बंडू पेद्दुलवार यांचे अगरबत्ती गोदाम पूर्णपणे अवैध असून तिथे कोणतीही अग्निशमन यंत्रणा उपलब्ध नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या धोकादायक गोदामावर मनपा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसून, संपूर्ण शहरातील शेकडो अवैध बांधकामे कागदोपत्री सिद्ध होऊनही त्यांच्यावर मेहेरबानी दाखवली जात आहे.

मनपा इमारतीच्या वैधतेवर उपस्थित झालेले प्रश्न

एकीकडे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मनपा आयुक्त अकनुरी नरेश यांना पत्र देऊन सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांच्या बांधकामांच्या मंजुरीची कागदपत्रे मागितली असता, प्रशासनाने त्या पत्राची कोणतीही दखल न घेता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. मात्र दुसरीकडे नगरसेवक चौधरी यांच्यावर राजकीय द्वेषातून तातडीने कारवाईचा बडगा उगवला जात आहे. या दुटप्पी कारभाराचा पर्दाफाश करताना चौधरी यांनी मनपाच्या स्वतःच्याच इमारतीच्या वैधतेवर खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे. २०११-१२ मध्ये बांधलेली मनपाची नवीन इमारत संरक्षित मंदिरापासून अवघ्या २७ मीटर अंतरावर असून, या बांधकामासाठी पुरातत्त्व विभागाची परवानगी घेण्यात आली होती का, याचा कोणताही पुरावा मनपा प्रशासन देऊ शकलेले नाही.

स्वतःचीच इमारत संशयाच्या भोवऱ्यात असताना मनपा प्रशासन आधी स्वतःची बेकायदेशीर इमारत पाडणार का, असा मार्मिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. जोपर्यंत नोटीस दिलेल्या सर्व अवैध बांधकामांवर समान न्यायाने कारवाई केली जात नाही आणि पी.एच. नगर येथील धोकादायक अगरबत्ती गोदामावर कडक पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा सडेतोड इशारा नगरसेवक राहुल चौधरी यांनी दिला आहे. महानगरपालिकेच्या या हुकूमशाही कारभाराविरोधात संपूर्ण शहरात संतापाची लाट पसरली असून, आंदोलनाला सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment