चंद्रपुरात रस्त्यावर सापडलेले इंडियन फ्लॅपशेल कासव वनविभागाच्या ताब्यात

चंद्रपूरच्या रस्त्यावर सापडले दुर्मिळ कासव, पुढे काय झाले?

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 11, 2026

चंद्रपूर – इंडियन फ्लॅपशेल कासव चंद्रपुरातील वर्दळीच्या रस्त्यावर सापडल्यानंतर नागरिकांच्या समयसूचकतेमुळे त्याला जीवदान मिळाले आहे. लालपेठ-बायपास महामार्गावर हे कासव रस्त्याच्या मधोमध आढळले होते. श्याम चक्रदेव यांनी कासवाला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यांनी वन्यजीव अभ्यासक अश्विन गोडबोले यांना माहिती दिली. गोडबोले यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या पथकाने कासवाची तपासणी केली. अंदाजे १० वर्षे वयाचे हे कासव निरोगी असून लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. (११ ऑक्टोबरपासून चंद्रपुरात भाऊंचा दांडिया, वाचा हि बातमी)

पर्यावरणप्रेमी आणि सजग नागरिकांच्या समयसूचकतेमुळे चंद्रपुरात एका दुर्मिळ ‘इंडियन फ्लॅपशेल’ (Indian Flap-shelled) प्रजातीच्या कासवाला जीवदान मिळाले आहे. वर्दळीच्या रस्त्यावर सापडलेल्या या मुक्या जिवाला नागरिकांच्या आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळे सुखरूप नवे आयुष्य मिळाले आहे.

लालपेठ-बायपास महामार्गावरून जात असताना श्याम चक्रदेव यांना रस्त्याच्या मधोमध एक जिवंत कासव आढळले. महामार्गावरील सततच्या वर्दळीमुळे या कासवाच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत चक्रदेव यांनी क्षणाचाही विलंब न लावता कासवाला सुरक्षित आपल्या ताब्यात घेतले आणि तातडीने याची माहिती वन्यजीव अभ्यासक अश्‍विन गोडबोले यांना दिली.

अश्‍विन गोडबोले यांनी तात्काळ पुढाकार घेत वनविभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर मूल मार्गावरील वनविभागाच्या पारगमन उपचार केंद्रातील (TTC) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार यांच्या मार्गदर्शनाखाली, कर्मचारी कृष्णा वाटेकर आणि महेश वाडगूरे यांनी कासवाला आपल्या ताब्यात घेतले.

कासवाची प्रकृती उत्तम

वनविभागाच्या पथकाने या कासवाची प्राथमिक आरोग्य तपासणी केली. अंदाजे १० वर्षे वयाचे हे कासव पूर्णपणे सुदृढ आणि निरोगी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाकडून या कासवाला लवकरच त्याच्या सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

काय आहे ‘इंडियन फ्लॅपशेल’ कासव?

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘इंडियन फ्लॅपशेल’ हे गोड्या पाण्यातील मऊ पाठीचे कासव आहे. याची पाठ चपटी, गोलाकार आणि चर्ममय (लेदरसारखी) असते. विशेष म्हणजे, यांच्या पाठीच्या खालच्या बाजूला त्वचेचे मऊ भाग किंवा ‘फ्लॅप्स’ असतात, ज्यांच्यामध्ये ते धोका निर्माण झाल्यास आपले पाय आणि मान पूर्णपणे लपवू शकतात. हे कासव प्रामुख्याने भारतभरातील नद्या, तलाव, दलदली आणि शेतातील पाणी साचलेल्या भागात आढळते.

नागरिकांच्या या सजकतेमुळे एका मुक्या प्राण्याचा जीव वाचल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment