मराठी साहित्यात 'अरण्यदीक्षा'ची भर! कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

February 24, 2026 by Prakash Hande

Aranya diksha Poetry Collection : चंद्रपूर : कवी किशोर कवठे यांची कविता इथल्या जमिनीशी घट्ट नाते सांगणारी असून स्वतःशी विश्वासार्हता निर्माण करणारी आहे. आपल्या भूगोलाची जाणीव ठेवत जागतिक पर्यावरणाचा विचार करणारी ही कविता नव्या जगाची किरणे प्रतिबिंबित करते. निसर्गाकडून दीक्षा घेण्याची गरज अधोरेखित करणारी ही महत्त्वपूर्ण कविता असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार विजेते विख्यात कवी, अनुवादक, व विदर्भ साहित्य संघाच्या युगवाणीचे संपादक प्रफुल्ल शिलेदार यांनी केले. (वाचन संस्कृती टिकवा, नव्या ग्रंथालयांना अनुदान द्या - खासदार धानोरकर

 

अक्षर साहित्य कला प्रतिष्ठान आयोजित व स्तंभ पब्लिशिंग हाऊस प्रकाशित राजुरा येथील सुप्रसिद्ध कवी किशोर कवठे यांच्या ‘अरण्यदीक्षा’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा नुकताच चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी  अध्यक्षस्थानाहून प्रफुल्ल शिलेदार बोलत होते. सुनील नामदेव कवठे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. भाष्यकार म्हणून नांदेड येथील प्रसिद्ध लेखिका व समीक्षक सुचिता खल्लाळ, अतिथी म्हणून प्रसिद्ध कवी व रेखाचित्रकार प्रमोदकुमार अणेराव आणि किशोर मुगल उपस्थित होते.

 

‘अरण्यदीक्षा’ या कवितासंग्रहात कवीची भूमिका स्वतःच्या जगण्याच्या केंद्रस्थानी आहे. काळ, अस्तित्व आणि अवकाश यांविषयीचे अनुभव कवी किशोर कवठे प्रामाणिकपणे कवितेतून मांडतात. दुर्लक्षित विषयांवर गहन चिंतन करत सभोवतालच्या नाटकी जगात प्रतिमा, भाषा आणि आशयसौंदर्याच्या माध्यमातून अस्सलतेने उतरलेली ही कविता व्यवस्थेच्या दांभिकतेविषयी प्रश्न विचारणारी बंडखोर कविता आहे, असे प्रतिपादन नांदेड येथील प्रसिद्ध लेखिका व समीक्षक सुचिता खल्लाळ यांनी भाष्यकार म्हणून केले. Kishor Kavthe

 

जगण्याची व लेखनाची अद्वैत भूमिका आणि समष्टीला समजून घेण्याची वृत्ती यामुळे कवितेतून संयत अंतःस्वर उमटल्याचे प्रमोदकुमार अणेराव यांनी सांगितले. तर आशय आणि अभिव्यक्तीच्या अंगाने कवठे यांची कविता मोठ्या उंचीची असल्याचे किशोर मुगल यांनी नमूद केले. यावेळी कवठे यांच्या कवितांचे प्रभावी अभिवाचन प्रवीण तुरानकर, अर्चना जुनघरे, गीता रायपूरे व राजेश देवाळकर यांनी केले. ‘अरण्यदीक्षा’ हा कवितासंग्रह मराठी साहित्यविश्वात महत्त्वाची भर घालणारा ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश पोईनकर यांनी केले. सूत्रसंचालन नरेशकुमार बोरीकर यांनी केले तर आभार सुरज दहागावकर यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Leave a Comment

+