"सावध व्हा! तुमच्या परिसरातही 'हा' विषारी साठा पोहोचलाय का? मुल पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या!"

February 15, 2026 by Prakash Hande

Banned Tobacco Seizure : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध साठ्याविरोधात मुल पोलिसांनी १४ फेब्रुवारी रोजी धडक कारवाई करत सुमारे ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. (घुग्गुसचा सद्दाम व चंद्रपूरातला सरफरोज ला गुन्हे शाखेने केली अटक, २१ लाखांचा मुद्देमाल जप्त)

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे साडेआठ वाजण्याच्या सुमारास मौजा सिताला, ता. मुल येथे छापा टाकण्यात आला. आरोपी नरेंद्र गणपती भुरसे (वय ४५) यांच्या घराची झडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ‘होला हुक्का शीशा’ व ‘ईगल हुक्का शीशा’ या नावाने विक्रीसाठी ठेवलेले प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आले. तपासादरम्यान हा साठा संदीप नामदेव बुरांडे (वय ४२), रा. देवाडा (खुर्द), ता. पोंभूर्णा याचा असल्याचे निष्पन्न झाले.

शासनाने संपूर्णपणे बंदी घातलेल्या तंबाखू उत्पादनांचा साठा करणे व विक्री करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मुल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानक कायद्याच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Banned Tobacco Seizure

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी यांच्यासह भोजराज मुंडरे, चिमाजी देवकाते, दिलीप आदे, नरेश कोडापे, संदीप चुदरी आणि शंकर बोलसरे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment

+