Chandrapur ACB Trap : चंद्रपूर - अनधिकृत बांधकाम न तोडण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थापत्य अभियंता ३० वर्षीय शुभम नंदकिशोर वरघट याने ३ लाख रुपयांची लाच मागितली होती, तडजोडीअंती २ लाख ३० हजार देण्याचे ठरले, त्यापैकी १ लाख आधी दिले व उर्वरित १ लाख ३० हजार रुपये घेतेवेळी अभियंता थेट एसीबीच्या जाळ्यात अडकला. या कारवाईमुळे चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (१५ बेरोजगार युवकांची फसवणूक करणारा चंद्रपुरातील नटवरलाल)
वर्ष २०२० मध्ये तक्रारदार यांनी १२०० स्के. फूट बांधकाम असलेले घर विकत घेतलेले होते, जे त्यांनी नंतर तोडत टिनाचे शेड टाकत त्याठिकाणी भंगार चा व्यवसाय सुरु केला, मात्र या दुकानांमुळे एका प्लॉट धारकाला रस्त्याची अडचण निर्माण झाल्याने त्यांनी याबाबत चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात तक्रार दिली होती. याबाबत भंगार व्यावसायिकाला नोटीस मिळाली, १४ फेब्रुवारीला तक्रारदार यांनी पंतप्रधान आवास योजना व अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त प्रभार असलेले अभियंता शुभम वरघट यांची भेट घेतली, त्यावेळी वरघट यांच्यासोबत खाजगी इसम दिनेश समदर हा सोबत होता.
तुमचे बांधकाम हे अनधिकृत आहे, जर ते तोडायचे नसेल तर आम्हाला ३ लाख रुपये द्यावे लागतील अशी मागणी वरघट यांनी तक्रारदाराला केली, तडजोडीअंती २ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले, १७ फेब्रुवारीला तक्रारदाराने १ लाख रुपये खाजगी इसम दिनेश समदर यांना अभियंता वरघट यांच्या सांगण्यावरून दिले. उर्वरित १ लाख ३० हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २० फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूरमध्ये तक्रार दिली.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करीत सापळा रचला त्याआधारे २१ फेब्रुवारीला उर्वरित १ लाख ३० हजाराची रक्कम देण्याचे ठरले, सदर रक्कम समदर यांच्याकडे देण्यात यावी असे वरघट यांनी सांगितले असता सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास भानापेठ मध्ये १ लाख ३० हजार रुपये देतेवेळी एसीबीने दिनेश समदर ला रंगेहात अटक केली, अभियंता शुभम वरघट यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग व लाचेची रकम खाजगी इसमांद्वारे स्वीकारल्याने एसीबीने दोन्ही आरोपीना अटक केली. Shubham Varghat
अभियंता वरघट यांनी काही महिन्यांपूर्वी हिंगलाज भवानी वॉर्डातील विनोद दुर्गे यांचे ४ फुटाचे अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोजर चा वापर केला होता, त्यावेळी त्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकांनी संशय व्यक्त केला होता. त्यासंदर्भात एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता. शहरातील अवैध अतिक्रमण धारकांना चंद्रपूर महानगरपालिकेतील अभियंता संरक्षण देण्याचे काम करतात. व अतिक्रमण न तोडण्यासाठी खाजगी इसमाची नेमणूक करीत लाच स्वीकारतात. चंद्रपूर मनपातील लाचखोर वृत्तीमुळे शहरात बडे अतिक्रमण धारकांवर कारवाई का होत नाही हे एसीबीच्या कारवाईनंतर उघडकीस आले आहे. २० फेब्रुवारीला जल्लोषात आपला वाढदिवस साजरा करीत दुसऱ्याच दिवशी हा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने अनेक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले.
सदरची यशस्वी कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर, पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन धर्मेजवार, पोलीस कर्मचारी अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, राजेंद्र चौधरी, रविकांत इंगळे, विजेंद्र वाढई, प्रदीप ताडाम, मेघा मोहुर्ले, सतीश सिडाम व संदीप कवरासे यांनी केली.
Leave a Comment