Crime News Chandrapur । चंद्रपुरात अल्पवयीन गुन्हेगारीचा भस्मासुर; रॅलीत नाचताना लागला धक्का; हातात तलवारी घेऊन निघाली गँग

April 17, 2026 by Prakash Hande

Crime News Chandrapur Today : चंद्रपूर - १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या रॅलीत गांची चौकात एका युवकाची चाकूने वार करीत हत्या करण्यात आली होती, डीजेवर नाचताना आरोपी युवकांचा हात रॅलीत सहभागी असलेल्या युवकांना लागल्याने हत्या झाली होती. तसाच प्रकार बाबुपेठ भागात घडला, या घटनेत बाबुपेठ मधील उड्डाणपुलावर जयंती रॅलीत नाचताना अल्पवयीन मुलांचा धक्का लागला यावरून त्या मुलांनी एकाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. पण पोलिसांच्या सतर्कतेने गुन्हा घडण्यापूर्वी त्यांचा डाव हाणून पाडला. पोलिसांनी याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल केला. (वीजमीटरमध्ये छेडछाड, पोलिसात गुन्हा दाखल

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबाना आदरांजली देण्याकरिता चंद्रपुरात भव्य जनसागर उसळला होता, मात्र काही गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. विविध मंडळाने शहरात भव्य रॅली काढली. बाबुपेठ भागातून अनेक बौद्ध अनुयायी डीजे सह रॅलीच्या माध्यमातून शहराकडे निघाले होते.

 

बाबुपेठ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपुलावर डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली, त्या गर्दीत नाचताना काही विधिसंघर्ष बालकांचा धक्का एकमेकांना लागला, आणि वाद सुरु झाला, वाद इतका वाढला कि थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. दुसऱ्या दिवशी १५ एप्रिलला १९ वर्षीय हरीश पप्पू गोस्वामी व २ विधिसंघर्ष बालक दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या घरी त्याला मारण्याकरिता गेले होते. मात्र तो त्याठिकाणी आढळून आला नाही.

 

त्यामुळे त्याला कॉल करीत मारण्याची धमकी दिली, त्या मुलाने काही दिवसांपूर्वी ऑनलाईन चाकू व तलवार असे धारदार शस्त्र ऑनलाईन मागविले होते, ते घेऊन येण्यास मित्रांना सांगितले, त्यानंतर ६ अल्पवयीन मुले अटलबिहारी वाजपेयी गार्डनजवळ तलवार चाकुसह पोहोचले. त्यावेळी गोस्वामी व त्याच्यासोबत असलेले २ अल्पवयीन त्याठिकाणी पोहोचले मात्र समोरच्या मुलाजवळ असलेले शस्त्र बघून ते तिघे पळून गेले.

 

विशेष बाब म्हणजे ६ अल्पवयीन मुले हातात शस्त्र घेऊन फिरत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता, १४ एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडाची पुनरावृत्ती पुन्हा होणार अशी शक्यता निर्माण झाली. सदर व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला, स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि विनोद भुरले हे आपल्या पथकासह शस्त्रधारी मुलांचा शोध घेत होते. यासह शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी पोउपनि दत्तात्रय  कोलटें यांना व्हिडीओ बाबत माहिती देत त्या मुलांना ताब्यात घेण्याचे निर्देशित केले.  Shocking Murder Attempt Foil

 

१६ एप्रिल रोजी व्हिडीओ मधील ४ इसम हे नेताजी चौकामधील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी १४ एप्रिलला रॅलीत नाचताना झालेल्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी मुलांकडून एक पांढऱ्या रंगाची तलवार, एक लोखंडी मूठ असलेली तलवार, एक स्टील पाईप स्वरूपातील हत्यार, पांढऱ्या रंगाचा चाकू, ३ मोबाईल असा एकूण ९१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे, याच प्रमुख कारण म्हणजे नशाखोरी, अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेल्याने कोणताही गंभीर गुन्हा करण्यासाठी ते मागेपुढे बघत नाही, वर्षभरापूर्वी महाराष्ट्र सरकारने अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १४ वर्षे करण्याची चर्चा केली होती, मात्र अजूनही हा प्रस्ताव विचाराधीन आहे. नशाखोरी व गंभीर गुन्हेगारी यावर पोलिसांनी कठोर पाऊले उचलणे अत्यावश्यक बनले आहे अन्यथा हि गुन्हेगारी भविष्यात रौद्र रूप धारण करेल.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, शहर पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात सपोनि राजेंद्र सोनवणे, पोउपनि दत्तात्रय कोलटें, पोउपनि विलास निकोडे, गुन्हे शाखा पोउपनि विनोद भुरले, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, गोहकार, किशोर वाकाटे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, दीपक डोंगरे, चंद्रपूर शहर पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, भावना रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, कपूरचंदं खरवार, रुपेश पराते, विक्रम मेश्राम, योगेश पिदूरकर, निलेश ढोक, प्रफुल भैसारे, सुशांत घिवे व दीपिका झिंगरे यांनी केली.             

Leave a Comment

+