Chandrapur BJP issues Whip : १० फेब्रुवारीला चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी मतदान होणार असून, भारतीय जनता पक्षाकडून संगीता खांडेकर यांना महापौर म्हणून मतदान करण्याचा व्हीप जारी करण्यात आला आहे. निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर भाजप गटनेते शेखर शेट्टी यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांना हा व्हीप जारी केला असल्याची खात्रीजनक माहिती सूत्रांनी दिली आहे. (चंद्रपुरातील जनता वाऱ्यावर, समस्या जैसे थे, नगरसेवक हॉटेलवर)
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सध्या चुरशीची लढत सुरू आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना मतदारांनी स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने महापौर पद मिळविण्याची दोन्ही पक्षांना समान संधी आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, भाजपकडून संगीता खांडेकर आणि सारिका संदुरकर यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी खुलासा करत सांगितले होते की, पक्षश्रेष्ठींकडून संगीता खांडेकर यांचे नाव महापौर पदासाठी निश्चित करण्यात आले असून त्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे अर्ज अवैध ठरल्यास पर्याय म्हणून अॅड. सारिका संदुरकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून तो परतही घेण्यात आला आहे. असे त्यांनी स्पष्ट केले होते.
आता आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार भाजपच्या सर्व नगरसेवकांनी उद्या मतदानाला उपस्थित राहत महापौर म्हणून संगीता खांडेकर यांनाच मतदान करावे, असा अधिकृत व्हीप गटनेते शेखर शेट्टी यांनी जारी केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्याच्या महापौर निवडणुकीत भाजपची भूमिका स्पष्ट झाली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Leave a Comment