चंद्रपुरात हत्तीरोगाचा धोका वाढला! ९ हजार रुग्ण सक्रिय; तुमचं गाव या यादीत नाही ना?

February 09, 2026 by Prakash Hande

Chandrapur Elephantiasis : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा हत्तीरोगासाठी अतिसंवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात सन २००४ पासून हत्तीरोग निर्मूलनासाठी दरवर्षी सामूहिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेमुळे नव्या हत्तीरोग रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. मात्र अद्याप काही तालुक्यांमध्ये संसर्गाची साखळी कायम असल्याने यावर्षीही आयडीए (IDA) पद्धतीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (चंद्रपूर महापौर निवडणूक, शिवसेना ठाकरे पक्षाला मोठी ऑफर

एमडीए २०२४ नंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार चिमूर, भद्रावती, चंद्रपूर ग्रामीण, राजुरा, मूल, सावली, पोभुर्णा, गोंडपिपरी व ब्रह्मपुरी या ९ तालुक्यांमध्ये हत्तीरोग संसर्गाचे प्रमाण आढळून आले. यापैकी ब्रह्मपुरी व पोभुर्णा तालुक्यात पोस्ट एमएफ सर्वेक्षणात एमएफ दर १ टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्याने विशेष लक्ष देण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोगाचे एकूण ९ हजार १८०  रुग्ण तर अंडवृद्धी चे ३१६ रुग्ण सक्रिय आहे.

राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हत्तीरोग निर्मूलनासाठी सामूहिक औषधोपचार मोहीम (एमडीए/आयडीए) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, पोभुर्णा, मूल, सावली, ब्रह्मपुरी व चिमूर या ६ तालुक्यांमध्ये १० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मोहीम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेत ६ तालुक्यांतील एकूण ४ उपजिल्हा रुग्णालये, २ ग्रामीण रुग्णालये व २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश असून, ६७४ गावांतील तसेच ५२ वॉर्डमधील सुमारे ७,२९,७९३ पात्र लोकसंख्येला औषधोपचार देण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सुमारे १,०४४ मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून, १७५ पर्यवेक्षकांकडे देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे.

औषधांचे सेवन हे आरोग्य कर्मचारी व स्वयंसेवकांच्या समक्षच करणे बंधनकारक असून, गोळ्या रिकाम्या पोटी न घेता जेवणानंतर घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन वर्षांखालील बालके, गर्भवती माता तसेच गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधे दिली जाणार नाहीत. Chandrapur Elephantiasis

औषध सेवनानंतर ताप, मळमळ, उलटी, डोकेदुखी यांसारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून आल्यास तत्काळ उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत विशेष प्रतिसाद पथक (Rapid Response Team) सज्ज ठेवण्यात आले आहे.

हत्तीरोगामुळे शारीरिक विकृती, अपंगत्व निर्माण होऊन रुग्णांना आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा हत्तीरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांनी या सामूहिक औषधोपचार मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय हत्तीरोग रुग्ण 
  • ब्रह्मपुरी १ हजार ५८७, नागभीड १ हजार ६८, चिमूर १ हजार ६६, सावली ९३५ 
  • सिंदेवाही ७६५, वरोरा ५१३, भद्रावती ५०५, मूल ४८३ 
  • चंद्रपूर मनपा हद्दीत ४०६, गोंडपिपरी ३९५, चंद्रपूर ग्रामीण ३४६
  • राजुरा ३३८, पोंभुर्णा २८५, बल्लारपूर २५५, कोरपना २१९ व जिवती तालुक्यात १६ रुग्ण आहे.

“आपला संकल्प – करूया चंद्रपूर जिल्हा हत्तीरोगमुक्त”
असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे, चंद्रपूर यांनी केले आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, 
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रकाश साठे उपस्थित होते.

Leave a Comment

+