जोरगेवार यांच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत ८५% ब्लॉकेज; डॉक्टरांनी नेमका काय घेतला निर्णय?

February 20, 2026 by Prakash Hande

 

Chandrapur MLA Health : चंद्रपूर : शहरातील सीएचएल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्यावर यशस्वीरीत्या अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर व सुधारत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये दिली आहे. (आमदार जोरगेवार यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल)

 

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी आमदार जोरगेवार यांची अचानक प्रकृती ढासळली. त्यांना छातीत दुखणे व अस्वस्थता जाणवत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्यांना ‘अनस्टेबल अँजायना’ (हृदयविकाराचा तीव्र प्रकार) झाल्याचे निदान झाले.

 

यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने तत्काळ कोरोनरी अँजिओग्राफी केली. या तपासणीत त्यांच्या डाव्या अँटेरियर डिसेंडिंग (LAD) या महत्त्वाच्या कोरोनरी आर्टरीमध्ये सुमारे ८५ टक्के अरुंदता (ब्लॉकेज) आढळून आली. ही स्थिती गंभीर स्वरूपाची असल्याने विलंब न करता अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

डॉक्टरांनी LAD आर्टरीमध्ये एक स्टेंट यशस्वीपणे बसवून अँजिओप्लास्टीची प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीशिवाय पार पडली. सध्या आमदार जोरगेवार यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली विश्रांती देण्यात येणार असल्याचेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. Chandrapur MLA Health

 

दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती समजताच समर्थक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रुग्णालयाकडून सकारात्मक हेल्थ बुलेटिन जारी झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Leave a Comment

+