Tiger District : चंद्रपूर : पर्यावरण कार्यकर्ते बंडू धोतरे यांनी चंद्रपूर जिल्ह्याला अधिकृतपणे ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करण्याची आपली जुनी मागणी पुन्हा एकदा पुढे आणली आहे. जगात एका जिल्ह्यात सर्वाधिक वाघांची घनता असलेल्या चंद्रपूरसाठी स्वतंत्र प्रशासकीय चौकट उभारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे वाघांचे संरक्षण अधिक मजबूत होईल तसेच वाढत्या वाघ–मानव संघर्षावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. (चंद्रपुरात राजमाता राणी हिराई जन्मोत्सव)
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहारडोंगरी लोह खाणीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धोतरे यांनी ही मागणी पुन्हा अधोरेखित केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या वाघांच्या संख्येचा विचार करता वन-वन्यजीव व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या विभागांमध्ये विखुरलेली व्यवस्था न ठेवता सर्व विभागांमध्ये समन्वय साधणारी एकत्रित प्रणाली आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सध्या ३०० हून अधिक वाघांसह चंद्रपूर जिल्ह्यात जगातील जवळपास पाच टक्के वाघांचे अस्तित्व आढळते. नागपूरला अनेकदा अनौपचारिकपणे ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हटले जाते; मात्र वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, एका जिल्ह्यातील सर्वाधिक वाघसंख्या लक्षात घेतल्यास चंद्रपूरच प्रत्यक्षात जगातील वाघांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.
‘स्टेटस ऑफ टायगर्स इन इंडिया २०२२’ या अहवालानुसार मागील मोजणीत चंद्रपूर जिल्ह्यात २४९ वाघ नोंदवले गेले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, त्यानंतर ही संख्या वाढून ३०० च्या पुढे गेली आहे, ज्यामुळे देशातील वाघ संवर्धनात या जिल्ह्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.
चंद्रपूरमधील वाघांचे अधिवास क्षेत्र ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (TATR) आणि त्याला लागून असलेल्या ब्रहमपुरी, चंद्रपूर आणि सेंट्रल चांदा या तीन प्रादेशिक वनविभागांमध्ये पसरलेले आहे. ही सर्व जंगल क्षेत्रे आणि वन्यजीव कॉरिडॉर एकमेकांशी जोडलेले असल्याने वाघांच्या प्रजनन, स्थलांतर आणि विस्तारासाठी महत्त्वाचे ठरतात.
अधिकृत आकडेवारीनुसार ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्पात ९५ वाघ, ब्रम्हपुरी वनविभागात ६५, चंद्रपूर वनविभागात ५२, तर सेंट्रल चांदा वनविभागात ३६ वाघ आहेत. परंतू आता या संख्येत अधिक भर पडली आहे. ताडोबा वनक्षेत्र ही जंगल भ्रमणमार्ग पुढे पूर्व उत्तर दिशेकडे गडचिरोली, नवेगाव नागझिरा तर उमरेड कर्हाड्ला अभयारण्य दक्षिणेकडे तेलंगणातील कावल व्याघ्र प्रकल्पाशी, इंद्रावती व्याघ्र प्रकल्पशी जोडली गेली असून त्यामुळे महत्त्वाचा आंतरराज्य वन्यजीव कॉरिडॉर तयार झाला आहे.
धोतरे यांनी ही मागणी प्रथम दशकापूर्वी मांडली होती. जुलै २०१२ मध्ये त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर समोर जिल्हातील प्रभावी व्याघ्र संवर्धनाच्या मागण्यासोबतच चंद्रपूरला ‘व्याघ्र जिल्हा’ घोषित करण्यासाठी नागपूर येथे अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य शासनाने या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी तीन मुख्य वनसंरक्षकांची समिती नेमली होती.
या समितीने तयार केलेले घोषणापत्र ३ एप्रिल २०१३ रोजी चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे पाठविले होते. त्यानंतर १ जुलै २०१३ रोजी हा प्रस्ताव राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात आला. मात्र प्रशासकीय बदलांमुळे हा प्रस्ताव पुढे अंमलात येऊ शकला नाही. Tiger Population
धोतरे यांच्या मते, आजच्या परिस्थितीत ही मागणी अधिकच महत्त्वाची ठरली आहे. व्याघ्र प्रकल्पाबाहेरही वाघांची संख्या वाढत असल्याने जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ–मानव संघर्ष तीव्र झाला आहे. मागील पाच वर्षांत अशा घटनांमध्ये जवळपास २०० ग्रामस्थांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यंदा चालू वर्षात ७ मृत्यू तर एक वाघ जेरबंद करण्यात आले आहे.
वनक्षेत्रात वाघ जिथे जिथे, तिथे तिथे व्यवस्थापनात एकसूत्रता
तसेच वन विभागाच्या कार्यपद्धतीत संसाधनांचे असमान वितरण असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित वन्यजीव विभागाकडे निधी आणि सुविधा तुलनेने अधिक असताना, प्रादेशिक वनविभागांमध्ये — जिथे वाघांची हालचाल आणि संघर्ष अधिक आहे — तिथे मनुष्यबळ व साधनसामग्रीची मोठी कमतरता असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूरला व्याघ्र जिल्हा घोषित केल्यास प्रशासकीय स्पष्टता, संसाधनांचे समतोल वितरण आणि सर्व विभागांमध्ये समन्वित व्यवस्थापन शक्य होईल, असे धोतरे यांचे मत आहे. यामध्ये महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या (FDCM) अखत्यारीतील जंगलांचाही समावेश असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय व्याघ्र संवेदनशील भागात काम करणाऱ्या प्रत्येक वनरक्षकाला कायमस्वरूपी मदतनीस, आवश्यक सुरक्षा साधने आणि वन कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण व मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची गरजही या प्रस्तावात अधोरेखित करण्यात आली आहे.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, चंद्रपूरला व्याघ्र जिल्हा घोषित केल्यास संपूर्ण जंगल पट्टीला एकात्मिक संवर्धन क्षेत्र म्हणून व्यवस्थापित करण्याची संधी निर्माण होईल. व्याघ्र प्रकल्प, प्रादेशिक जंगल किंवा एफडीसीएम क्षेत्र असे वेगळे न पाहता वाघ असलेल्या प्रत्येक भागाला ‘व्याघ्र संवेदनशील क्षेत्र’ मानून एकसमान धोरण राबविता येईल.
चंद्रपूर आज जगातील सर्वात महत्त्वाच्या व्याघ्र अधिवासांपैकी एक म्हणून उदयास येत असताना, वाघांचे संरक्षण आणि जंगलालगत राहणाऱ्या लोकांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष प्रशासकीय व्यवस्था उभारणे आता काळाची गरज असल्याचे या मागणीचे समर्थक सांगतात.
“आज ताडोबा कोर बफर मधील वाघ आणि गावांना वेगळा दर्जा तर बाहेरील वाघ आणि गावांना दुय्यम दर्जा असल्याचे चित्र आहे. मात्र संरक्षित कोर बफर पेक्षा प्रादेशिक च्या वनक्षेत्रात वाघाची संख्या, गावांची घनता अधिक असून येथे वाघ मानव संघर्ष अधिक असताना आवश्यक निधी आणि संसाधन बाबत मात्र कमालीची अनास्था दिसून येते. यामुळे व्याघ्र जिल्हा फक्त नावासाठी नाहीतर प्रशासकीय दृष्ट्या राज्यस्तरावर निधी पुरवठा करताना, येथील समस्या सोडवितांना सर्व विभागाची एकत्रित येत सांगड घालणे सोयीचे होईल, म्हणून विशेष दर्जाआवश्यक आहे.” Tiger Reserve
बंडू धोतरे,
अध्यक्ष इको-प्रो तथा
माजी सदस्य राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ
______________
चंद्रपूर जिल्हा : सर्वाधिक वाघ मानव संघर्ष
५ वर्षात २०० मृत्यू
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मानव संघर्ष लक्षात घेता राज्य सरकार ने २०२० मधे “चंद्रपूर जिल्हा वाघ मानव संघर्ष तांत्रिक अभ्यास समिती” गठीत केली होती. २०२१ मधे सदर समितीचा अहवाल प्राप्त झाला, तो शासनाद्वारे स्वीकारला गेला. त्याची अमलबजावणी बाबत राज्य वन्यजीव सल्लगार मंडळाच्या बैठकीत शिफारस करण्यात आले मात्र ५ वर्षाचा कालवधी लोटून सुध्दा अमलबजावणी नाही. २०२१ ते २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात २०० लोकांचा मृत्यू झालेला आहे.
______________
सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेल्या ब्रह्मपुरी वनविभाग मधील स्थिती
या क्षेत्रात वाघाची वहनक्षमता ही फक्त ४० असताना येथे
वयस्क वाघ - ६५
अवयस्क - १७
बछडे - जवळपास ७०
जिल्ह्यातील मागील ५ वर्षात २०० पैकी ७२ मृत्यू तर मागील वर्षी जिल्ह्यातील ४७ मानव मृत्यू पैकी १८ मृत्यू ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत झाले आहे. या संघर्षात मानवी जीवितास धोकादायक ठरले म्हणून १० वाघ जेरबंद करण्यात आले यावरून संघर्षाची दाहकता लक्षात येईल.
Leave a Comment