"आमदार जोरगेवार पुरावे द्या, अन्यथा जाहीर माफी मागा!" मनोज पोतराजे यांचं आव्हान

February 13, 2026 by Prakash Hande

Chandrapur Politics : चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्या पत्नी पूजा मनोज पोतराजे यांना भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. एम ई एल प्रभाग क्रमांक ३ मधील ओबीसी महिला राखीव गटातून त्यांचे नाव अधिकृत उमेदवारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने जाहीर झाली होती. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे निवडणूक प्रमुख व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने उमेदवारांची अधिकृत यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत माझ्या पत्नीचा समावेश असणे हे आमच्यासाठी सन्मानाचे आणि पक्षाच्या विश्वासाचे प्रतीक होते. (मनपा महापौर पदग्रहण सोहळ्याला लागले ग्रहण, आमदाराला निमंत्रण नाही)

 

मात्र, या संपूर्ण प्रक्रियेनंतर अचानकपणे आणि कोणतेही ठोस कारण नसताना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी पक्षशिस्त आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाला हरताळ फासत माझ्या पत्नीचे तिकीट कापले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर माध्यमांसमोर माझ्यावर अत्यंत गंभीर आणि बिनबुडाचे आरोप करत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्रचार केला, अशी खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. हे आरोप केवळ निराधार नाहीत, तर एका सामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्याच्या राजकीय आयुष्यावर डाग लावण्याचा प्रयत्न आहेत.

 

मी एक साधा कार्यकर्ता असून अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जनतेची सेवा करत आहे. माझी ओळख ही नेहमीच पक्षनिष्ठ, प्रामाणिक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा कार्यकर्ता अशी राहिली आहे. मी कधीही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. उलट, त्यांच्या नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर माझा पूर्ण विश्वास आहे.

 

मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मागासवर्गीयांच्या आरक्षणासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर मी सलग १५ दिवस आमरण उपोषण केले होते. हे उपोषण आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आंदोलनात विविध विचारांचे आणि विविध पक्षांचे लोक सहभागी होते. या उपोषणाची गंभीर दखल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली होती. त्यांनी मला वैयक्तिकरित्या फोन करून आंदोलनाची माहिती घेतली आणि संबंधित विषयाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या विनंतीनंतरच मी माझे उपोषण मागे घेतले. जर मी त्यांच्या विरोधात असतो, तर त्यांनी माझ्या आंदोलनाची दखल घेतली नसती, हे सत्य जनतेला माहीत आहे. Chandrapur Politics

 

माझ्यावर असा आरोप करण्यात आला की, मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात प्रचार केला. परंतु, आजपर्यंत याचा एकही ठोस पुरावा समोर आणलेला नाही. केवळ काही एडिट केलेले स्क्रीनशॉट दाखवून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून एका निष्ठावान कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे.

मी अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. त्यांच्या माध्यमातून मी जनतेच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या कामाची आणि निष्ठेची साक्ष संपूर्ण चंद्रपूर जिल्हा देऊ शकतो. महापौर निवडीच्या वेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा विजय झाल्यानंतर मी आनंद व्यक्त करत पक्षाचा झेंडा घेऊन नाचलो. हा माझ्या पक्षनिष्ठेचा आणि आनंदाचा नैसर्गिक भाव होता. यात कोणताही राजकीय हेतू नव्हता.

 

मात्र, आमदार किशोर जोरगेवार यांनी जाणीवपूर्वक माझ्यावर खोटे आरोप करत माझे राजकीय आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर चुकीची माहिती देऊन माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. हे केवळ अन्यायकारक नाही, तर पक्षातील एका सामान्य कार्यकर्त्याच्या भावनांवर घाव घालणारे आहे.

 

याउलट, माझ्याकडे असे पुरावे आहेत की, आमदार किशोर जोरगेवार यांनी पूर्वी यंग चंदा ब्रिगेडच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पार्टीविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे, माझ्यावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या भूतकाळाचा विचार करणे गरजेचे आहे.

 

म्हणूनच, मी आमदार किशोर जोरगेवार यांना खुले आव्हान देतो की, त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत. त्यांनी ज्या चौकात बोलावले, त्या चौकात येऊन मी सत्य जनतेसमोर मांडायला तयार आहे. जर माझ्याकडून मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कुटुंबीयांविरोधात एकही वक्तव्य सिद्ध झाले, तर मी सार्वजनिक जीवनातून कायमचा दूर जाण्याची तयारी ठेवतो. परंतु, जर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी जनतेची आणि पक्षाची माफी मागावी. Chandrapur Politics

 

मी आजही भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पुढेही राहणार आहे. माझे ध्येय केवळ जनतेची सेवा करणे आणि पक्ष मजबूत करणे हेच आहे. कोणत्याही खोट्या आरोपांनी किंवा राजकीय कटकारस्थानांनी माझा आत्मविश्वास डळमळीत होणार नाही. सत्य हे नेहमीच विजयी होते, आणि मला पूर्ण विश्वास आहे की, सत्य जनतेसमोर येईल.

Leave a Comment

+