चंद्रपूरकरांची तहान भागणार! रामनगर केंद्राची क्षमता वाढली; 'या' २५ भागांना मिळणार मुबलक पाणी

February 26, 2026 by Prakash Hande

Chandrapur Water Supply Update : चंद्रपूर २६ फेब्रुवारी - चंद्रपूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता 'अमृत' योजनेअंतर्गत रामनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राचे विस्तारीकरण करण्यात आले असून, या केंद्राची क्षमता आता १०.५ दशलक्ष लिटर वरून १५ दशलक्ष लिटर इतकी वाढली आहे. या प्रकल्पामुळे शहराच्या ३० टक्के भागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. (माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर मनपाची झेप)


   रामनगर येथील जुने जलशुद्धीकरण केंद्र जीर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचणी येत होत्या. शहराची वाढती व्याप्ती पाहता जुन्या केंद्राची क्षमता अपुरी पडत होती. यावर उपाय म्हणून अमृत योजनेअंतर्गत १५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या नवीन केंद्राचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. सध्या हे बांधकाम पूर्ण झाले असून, केवळ मुख्य टाकीला जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होताच संबंधित भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असुन नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या तासात (वेळेत) देखील वाढ होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई दूर होण्यास मदत मिळणार आहे.



या नवीन केंद्रामुळे खालील भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे -
नगीना बाग, चोर खिडकी, चपराशी कॉलनी, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, अंचलेश्वर वार्ड,महाकाली वार्ड, भिवापूर वार्ड, बैल बाजार, रामाळा तलाव रोड, बगड खिडकी, जलनगर वार्ड, जटपुरा वार्ड, हॉस्पिटल वार्ड, बाजार वार्ड, एकोरी मंदिर वार्ड,ख्रिश्चन कॉलनी, पंचशील चौक, रामनगर, बोकारे प्लॉट, राष्ट्रवादी नगर,आंबेडकर सभागृह नगर, ठक्कर कॉलनी, सिस्टर कॉलनी आणि जगन्नाथ बाबा नगर.

Leave a Comment

+