CIPET Chandrapur News : चंद्रपूर - सिपेट सीएसटीएस चंद्रपूर यांच्या वतीने 20 फेब्रुवारी 2026 रोजी ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शहरातील एन.डी. हॉटेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे. (रुपाली चाकणकर चंद्रपुरात, ९५ तक्रारीचा निपटारा)
चंद्रपूर येथे सिपेट स्थापना झाल्यापासून प्लास्टिक उद्योगपूरक विविध नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जात आहेत. याच अनुषंगाने रसायने आणि खते मंत्रालय, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, भारत सरकार यांच्या सौजन्याने सदर राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र आयोजित करण्यात येत आहे.
या चर्चासत्रात प्लास्टिक कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन, आधुनिक पुनर्वापर तंत्रज्ञान, शाश्वत विकासाची दिशा तसेच चक्रीय अर्थव्यवस्थेची संकल्पना यावर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.CSIR-NEERI, VNIT नागपूर, CIPET तसेच प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील दिग्गज तज्ज्ञ या कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होऊन उद्योग आणि समाजामध्ये शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्यास चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. उद्योग क्षेत्रातील इच्छुक उमेदवार, विद्यार्थी, संशोधक, पर्यावरण तज्ञ व संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“राष्ट्रीय स्तरावरील मोठी कार्यशाळा प्रथमच चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येत असून संबंधित क्षेत्रातील व्यक्तींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन सिपेट चंद्रपूरचे संचालक व प्रमुख श्री. प्रवीण बच्छाव यांनी केले आहे.
Leave a Comment