Coal Washery Pollution : चंद्रपूर: "देशाचे पोलाद उत्पादनाचे लक्ष्य गाठताना स्थानिक पर्यावरणाचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा बळी दिला जाऊ नये. कोळसा धुलाई केंद्रांची (वॉशरी) कार्यक्षमता तातडीने सुधारून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे ही काळाची गरज आहे," अशी ठाम भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली. नवी दिल्ली येथील संसदीय सौध विस्तार भवन, समिती कक्ष ‘डी’ मध्ये आयोजित कोळसा, खाण व पोलाद विषयक स्थायी समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीत त्यांनी कोकिंग कोलची उपलब्धता वाढवणे आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याबाबत केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले. (खासदार धानोरकरांची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी)
या बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी कोकिंग कोल वॉशिंग क्षमतेचा केवळ ५०% वापर होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. २०३० पर्यंत ३०० MTPA पोलाद उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी ४८ MT 'वॉशड कोल'ची आवश्यकता आहे. मात्र, भोजूडीह वॉशरी सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणारा विलंब विकासाला खीळ घालत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या विलंबासाठी जबाबदार कंत्राटदारांवर काय कारवाई केली, याचा जाब त्यांनी मंत्रालयाच्या प्रतिनिधींना विचारला. तसेच, सुधारित EPC मॉडेलमुळे वॉशरी टेंडर्समध्ये पारदर्शकता आणून कामे वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीदरम्यान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणाचा मुद्दा लावून धरला. कोळसा धुलाई प्रक्रियेमुळे हवेत पसरणारे सूक्ष्म धुलिकण आणि त्याचा शेतीवर होणारा विपरीत परिणाम रोखण्यासाठी कोल इंडियाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याच बैठकीत, खासदार प्रतिभा धानोरकर यांची १८व्या लोकसभेसाठी 'भारत-उझबेकिस्तान संसदीय मैत्री गटाच्या' सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर संसदीय सहकार्य आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. Pratibha Dhanorkar MP
Leave a Comment